अण्णांना शांत करण्याचा भाजपचा प्रयत्न तर आघाडीचा भडकवण्याचा? वाचा गृहमंत्री देशमुख काय म्हणतायत?

अण्णा हजारे यांनी आंदोलनाची घोषणा केल्याने भाजप नेते त्यांना भेटून शांत करण्याचा प्रयत्न करत असताना गृहमंत्री देशमुखांनी मात्र अण्णांचा भडकवण्याचा प्रयत्न केलाय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:31 PM, 24 Jan 2021
अण्णांना शांत करण्याचा भाजपचा प्रयत्न तर आघाडीचा भडकवण्याचा? वाचा गृहमंत्री देशमुख काय म्हणतायत?
anil deshmukh, Devendra fadanvis meet Anna hajare

यवतमाळ : शेतकर्‍यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने ठोस भूमिका घेणे अपेक्षित होते. मात्र, केंद्राने ताठर भूमिका घेतली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा चांगला निर्णय घेतला आहे. त्यामुळे आंदोलनाला नक्कीच ताकद मिळेल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. अण्णा हजारे यांनी आंदोलनाची घोषणा केल्याने भाजप नेते त्यांना भेटून शांत करण्याचा प्रयत्न करत असताना गृहमंत्री देशमुखांनी मात्र अण्णांचा भडकवण्याचा प्रयत्न केलाय. (Home Minister Anil Deshmukh On Anna hajare Protest)

अण्णा हजारे यांनी 2013 मध्ये दिल्लीत ऐतिहासिक आंदोलन केले. त्यावेळी सगळा देश आंदोलनात उतरल्याचे आपण बघितले आहे. शेतकर्‍यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने ठोस भूमिका घेणे अपेक्षित होते. मात्र, केंद्राने ताठर भूमिका घेतली आहे. अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा चांगला निर्णय घेतला आहे. त्यामुळे आंदोलनाला नक्कीच ताकद मिळेल, अशी अपेक्षा गृहमंत्री देशमुख यांनी व्यक्त केली.

केंद्रातील भाजप सरकारविरोधात अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अण्णांच्या या इशाऱ्यानंतर भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ माजली आहे. दिल्लीच्या सीमेवर गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं तर केंद्र सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता काही दिवसांपासून राज्यातील भाजप नेत्यांकडून अण्णांची मनधरणी करण्याचं काम सुरु आहे.

दोनच दिवसांपूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री आणि भाजपनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी थेट राळेगणसिद्धी इथं जात अण्णा हजारेंची भेट घेतली. फडवणीस यांच्यापूर्वी विखे पाटील आणि अण्णा हजारे यांच्यात तासभर चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस, विखे-पाटील आणि अण्णांमध्ये पुन्हा एकदा दीड तास बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी गिरीश महाजनही उपस्थित होते. भाजपच्या गोटातून अण्णांना शांत करण्याचा प्रयत्न केला जात असताना गृहमंत्री देशमुख यांनी अण्णांनी आंदोलन केल्याने शेतकरी आंदोलनाला ताकद मिळेल, अशी आशा व्यक्त केलीय.

दुसरीकडे भाजप नेत्यांच्या बैठकीनंतरही आपण आंदोलनावर ठाम असल्याचं अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्रीय कृषीमंत्री यांनी दिलेलं पत्र देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला दिलं. त्यावर चर्चा झाली पण तोडगा निघाला नाही, असं अण्णा हजारे यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर सांगितलंय.

अण्णा हजारेंचा 30 जानेवारीला उपोषणाचा इशारा

अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर 30 जानेवारी 2021 रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे. अण्णांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर केंद्रातील सत्ताधारी भाजप नेत्यांमध्ये खळबळ माजली आहे. सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या झडताना दिसून येत आहेत. पण अद्याप कृषी कायद्याबाबत तोडगा निघालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांचं उपोषण सरकारसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जातीये. (Home Minister Anil Deshmukh On Anna hajare Protest)

हे ही वाचा

‘संकटमोचक’ गिरीश महाजन अण्णांच्या भेटीला, शेतकरी आंदोलनात न उतरण्यासाठी भाजपची डिप्लोमसी?

भाजपला अण्णांची भीती?, बागडे राळेगणसिद्धीत; दीड तास खलबतं