…तर पवारसाहेब तुमच्यासाठी ‘सीरम’मध्ये वशिला लावतील; निलेश राणेंचा अजितदादांना टोला

तुम्ही ठरवलं लस घ्यायची आहे तर तुम्हाला थांबवणार कोण? | Nilesh Rane

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:09 AM, 23 Jan 2021
...तर पवारसाहेब तुमच्यासाठी 'सीरम'मध्ये वशिला लावतील; निलेश राणेंचा अजितदादांना टोला

मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांना कोरोनाची लस टोचून घ्यायची असेल तर शरद पवार (Sharad Pawar) त्यांच्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये वशिला लावतील, अशी खोचक टिप्पणी भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केली. अजित पवार यांना नुकताच तुम्ही लस कधी घेणार, असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा परवानगी मिळाल्यानंतर मी लस घेईन, असे अजितदादांनी सांगितले होते. (Nitesh Rane taunts Ajit Pawar over corona vaccination)

अजित पवारांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत निलेश राणे यांनी खोचक शैलीत ट्विट केले आहे. कोणाची परवानगी घेतली की आपण लस घ्यायला तयार व्हाल अजित पवार साहेब? तुम्ही ठरवलं लस घ्यायची आहे तर तुम्हाला थांबवणार कोण? पवार साहेब वशिला लावून तुमच्यासाठी एक डोस बाजूला काढू शकतात पण नेहमी पळवाट काढणं बरं नव्हे. पवार साहेबांवर तरी विश्वास आहे ना तुमचा, असा सवाल निलेश राणे यांनी अजितदादांना विचारला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलेश राणे यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे आता पाहावे लागेल.

अजित पवार काय म्हणाले होते?

पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस यांनाच कोरोना लस दिली जात आहे. आम्हाला ज्या वेळेस लस घेण्याची परवानगी मिळेल, त्यावेळी घेऊ आणि तुम्हाला सांगू, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते.

लसीचे फारसे दुष्परिणाम नाहीत : अजित पवार

कमी लसीकरणाबाबत अधिकाऱ्यांना विचारलं, तेव्हा काही कारणं समजली. संबंधित व्यक्ती आली आणि केंद्रावर आल्यावर म्हणाली की मला लस नाही घ्यायची. काही जणांना रात्री उशिरा कळवल्याने सकाळी येता आलं नाही. पण लस घेतलेल्या तीन-चार डॉक्टरांशी माझं बोलणं झालं. त्यांनी कुठलेही साईड इफेक्ट नसल्याचं सांगितलं. एका डॉक्टरला थोडासा ताप, कणकण जाणवत होती. मात्र तिसऱ्या दिवसापासून ते ठणठणीत झाले, असंही अजित पवारांनी सांगितलं.

केंद्र सरकारनं परवानगी दिली मी आत्ता लगेच लस घेईन: राजेश टोपे

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसीच्या सुरक्षिततेविषयी राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या साशंकतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना तुम्ही कोरोनाची लस कधी घेणार, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा टोपे यांनी माझी वेळ आल्यावर मी लस घेईन, असे स्पष्ट केले. केंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत: त्यासाठी पुढाकार घेईन. पण सध्याच्या नियमांनुसार आमचा टर्न नंतर आहे. केंद्र सरकारने लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम प्राधान्य देण्याचे ठरवल्याचे टोपे यांनी सांगितले होते.

संबंधित बातम्या:

Corona Caller Tune: कोरोनाच्या ‘कॉलर टय़ून’मुळे डोक्याला ताप; दररोज तीन कोटी तास वाया

COVID 19 Vaccine: लस घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी वॉर्डबॉयचा मृत्यू

मी ना डॉक्टर ना पोलीस, परवानगी मिळाली की लस घेईन आणि सांगेन : अजित पवार

(Nitesh Rane taunts Ajit Pawar over corona vaccination)