कर्नाटकात राजकीय भूकंप, उपमुख्यमंत्र्यांसह 32 मंत्र्यांचे राजीनामे

कर्नाटकात राजकीय भूकंप, उपमुख्यमंत्र्यांसह 32 मंत्र्यांचे राजीनामे

कर्नाटकच्या राजकारणात भूकंप आला आहे. अस्थिर सरकारमधील उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच 32 मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस कोट्यातील सर्व मंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव यांच्याकडे राजीनामा सोपवला.

सचिन पाटील

|

Jul 08, 2019 | 12:53 PM

मुंबई/बंगळुरु : कर्नाटकच्या राजकारणात भूकंप आला आहे. अस्थिर सरकारमधील उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच 32 मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस कोट्यातील सर्व मंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव यांच्याकडे राजीनामा सोपवला. याशिवाय उपमुख्यमंत्री जी परमेश्वरम यांनीही राजीनामा दिल्याने कर्नाटकच्या राजकारणात भूकंप आला.

सोमवारी सकाळीच मंत्री आणि अपक्ष आमदार नागेश यांनी राजीनामा दिला होता. राज्यपालांना राजीनामा देताना नागेश यांनी कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचं म्हटलं होतं. जर राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापनेचं आमंत्रण दिलं तर आपण त्यांना पाठिंबा देऊ असंही नागेश यांनी म्हटलं.

त्याआधी सोमवारी सकाळी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांनी सर्व काँग्रेस आमदारांना ब्रेकफास्ट मीटिंगला बोलावलं. बैठक संपल्यानंतर परमेश्वर यांनी आपण सर्व आमदारांशी सद्यस्थितीबाबत चर्चा केल्याचं सांगितलं. जर गरज पडल्यास आम्ही सर्व आमदार राजीनामा देऊ आणि सर्व आमदारांना सोबत घेऊ असंही ते म्हणाले.

कर्नाटकचे आमदार मुंबईत

कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसच्या 11 आमदारांनी शनिवारी (6 जुलै) विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जाऊन राजीनामा दिला. त्यानंतर हे सर्व आमदार मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील सोफिटेल हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह भाजपचे अनेक नेते काँग्रेस-जेडीएस आमदारांची मनधरणी करण्यासाठी सोफिटेल हॉटेलमध्ये पोहोचले.

नेमकं प्रकरण काय?

कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसच्या 11 आमदारांनी शनिवारी (6 जुलै) विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जाऊन राजीनामा दिला होता. राजीनामा दिलेल्या आमदारांमध्ये काँग्रेसचे 8, तर जेडीएसचे 3 आमदार होते. त्यानंतर काँग्रेस-जेडीएस आमदारांच्या राजीनाम्याचं सत्र सुरुच आहे. राजीनामा देऊन हे सर्व आमदार मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील सोफिटेल हॉटेलमध्ये पोहोचले. त्यानंतर काँग्रेससह भाजपच्याही नेत्यांनी सोफिटेल हॉटेल गाठले.

कर्नाटकात राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचं काँग्रेस-जेडीएस सरकार धोक्यात आहे. भाजप नेते येडीयुरप्पा पुन्हा सत्ता स्थापन्याच्या तयारीत आहेत.

कुमारस्वामी अमेरिकेवरुन भारतात

कर्नाटकात राजकीय भूकंप आला असताना, अमेरिका दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री कुमारस्वामी रविवारी रात्री भारतात परतले. त्यांनी उपमुख्यमंत्री परमेश्वर यांची ताज हॉटेलमध्ये जाऊन भेट घेतली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली. मात्र या चर्चेनंतरही कर्नाटकातील सरकारवर टांगती तलवार कायम आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक

कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी गेल्या वर्षी निवडणुका झाल्या. या निवडणुकीत  भाजप 104, काँग्रेस 80 आणि जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या. त्यात भाजप पहिल्या क्रमांचा पक्ष ठरला होता, मात्र काँग्रेस आणि जेडीएस एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जेडीएसचे कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.  इथे सत्ता स्थापनेसाठी 113 जागांची गरज आहे.

कर्नाटकातील पक्षीय बलाबल

कर्नाटक विधानसभेत एकूण 225 जागा आहेत, तर एक नामांकित सदस्य आहे. बहुमतासाठी 113 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेस 80 जेडीएस 37, केपीजेपी 1, बसपा 1 आणि 1 अपक्ष अशा 120 आमदारांसह सध्या काँग्रेस-जेडीएसची सत्ता आहे. भाजपचे 104 आमदार निवडून आले होते. त्यामुळे भाजपला आणखी किमान दहा आमदारांची आवश्यकता आहे. आपल्याला 120 आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे सरकारला कोणताही धोका नसल्याचं कुमारस्वामींनी यापूर्वी म्हटलं होतं.

संबंधित बातम्या 

कर्नाटकात उलथापालथ निश्चित, काँग्रेस-जेडीएसचे 10 आमदार राजीनामा देऊन मुंबईत    

कर्नाटकात 11 आमदारांचे राजीनामे, जेडीएस-काँग्रेस सरकार धोक्यात  

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें