
महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबतचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाही. नाशिकमध्ये येत्या 20 मे ला मतदान होणार आहे. महाविकास आघाडीकडून नाशिकसाठी उमेदवाराची घोषणा होऊन जोरदार प्रचार देखील सुरु करण्यात आलेला आहे. पण महायुतीत अद्याप नाशिकच्या जागेचा तिढा सुटलेला नाही. नाशिकच्या जागेच्या मतदानासाठी केवळ 20 दिवस बाकी असल्याने अखेर भाजपने या जागेवरचा दावा सोडला आहे. स्वत: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत घोषणा केली आहे. पण तरीही नाशिकच्या जागेचा तिढा सुटलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचादेखील या जागेवर दावा आहे. तसेच शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे देखील या जागेसाठी आग्रही आहेत. त्यामुळे नाशिक लोकसभेच्या जागेबाबत ट्विस्ट निर्माण झाला आहे.
“नाशिकच्या जागेचा निर्णय एकनाथ शिंदेजींनाच घ्यायचा आहे. हा तिढा सोडवावाच लागेल. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस राहिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईच्या जागांची घोषणा केली. यानंतर आता नाशिकचाही तिढा सोडवतील. नाशिकची निवडणूक पाचव्या टप्प्यात आहे. इथे 20 मे ला मतदान आहे. आज 30 तारीख आहे. 20 दिवस बाकी आहेत. 20 दिवसात किती प्रचार करणार?”, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळेंनी केला.
“नाशिकमध्ये तुम्हाला खरी निवडणूक दिसेल. नाशिकमध्ये मी आज दिंडोरी लोकसभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला आलो आहे. नाशिकची जागा एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे बसवून ठरवतील. ही जागा ती त्यांनी दोघांनी बसून ठरवायची आहे. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे निर्णय घेतील. भाजपने आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी नाशिकच्या जागेचा आग्रह सोडलेला आहे”, अशी मोठी घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
“मंत्री छगन भुजबळ यांनी विदर्भात खूप प्रचार केला. दुसऱ्या टप्प्यातही प्रचार केला. तिसऱ्या टप्प्यात जास्तीत जास्त राष्ट्रवादी लढत आहे. त्या भागात गेले असतील. मला फार माहिती नाही. छगन भुजबळ नाराज नाहीत. ते महायुतीतील मोठे नेते आहेत. जबाबदार नेते आहेत. ते एका लोकसभेवरून नाराज होणारे नेते नाहीत. अत्यंत जबाबदार नेते आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना असतात. आपल्या नेत्यांनी लढायला पाहिजे. महायुतीत जेव्हा निर्णय होतात तेव्हा सर्वांनीच त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे आणि ती आम्ही करत आहोत”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.