Share Market Scam : नायडूंच्या पत्नीला 521 कोटींचा फायदा, 30 लाख कोटींच नुकसान, अमित शाहंवर आरोप काय?
Share Market Scam : लोकसभा निवडणूक निकालाआधी शेअर मार्केटमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. आज याच संदर्भात दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने सेबीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली व चौकशीची मागणी केली.
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले. या एक्झिट पोलच्या आकड्यांमुळे गुंतवणूकदारांचे काही लाख कोटी बुडाल्याचा आरोप होतोय. कारण एक्झिट पोलच्या आकड्यांवर विश्वास ठेऊन गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केली. पण प्रत्यक्षात निकाल वेगळा लागला. काँग्रेसने सुद्धा हा मुद्दा लावून धरला आहे. “लोकसभा निवडणुकीत शेअर मार्केटमध्ये मानवी हस्तक्षेप करून घोटाळा करण्यात आलाय. यात एक्झिट पोलचा आधार घेतला गेला. 30 लाख कोटी रूपयांचा सामान्य भागधारकांचा तोटा झालाय. आम्ही सेबीचे अधिकारी भाटीया यांना तक्रार दिली आहे” असं कल्याण बॅनर्जी म्हणाले.
“अमित शहा निवडणूक प्रचारात सांगत होते की शेअर्स खरेदी करा. ते कसे काय सांगू शकतात. चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नीला 521 कोटींचा फायदा यातून झालाय. ते आता का शांत आहेत?. सातव्या फेजचे मतदान सुरू असताना एक्झिट पोल कसे काय प्रसिद्ध केले गेले. सेबीने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करायला हवी” अशी मागणी कल्याण बॅनर्जी यांनी केली. या घोटाळ्यामागे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघे आहेत, असा आरोप त्यांनी केला.
सेबीकडे घोटाळ्याच्या चौकशीची मागणी
“मोदी, शाह आणि निर्मला सितारामन हे तिघे दोषी आहेत. या तिघांनी राजीनामा दिला पाहिजे. घोटाळा झाला आहे तर राजीनामा द्यावा” अशी मागणी सागरीका घोष यांनी केली. “एक्झिट पोलच्या अगोदर मोदी व शहा यांनी आवाहन केले की तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवा. नफ्याच्या आशेपोटी गुंतवलेल्या 30 लाख कोटी रूपयांचा सामान्यांचा तोटा झाला. एक्झिट पोल करणा-या संस्था FII शी संबंधित आहेत. आम्ही या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी सेबीकडे केलीय” असं दक्षिण मुंबईचे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले.