Eknath Shinde | शिंदे सरकारचं खातेवाटप आणखी 10 दिवस लांबणार? भाजप पक्षश्रेष्ठींचा प्लॅन काय?

11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टातील सुनावणी झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे म्हटले जात होते. मात्र भाजपचे नेते त्यानंतरही वेळ काढणार असल्याची माहिती हाती आली आहे.

Eknath Shinde | शिंदे सरकारचं खातेवाटप आणखी 10 दिवस लांबणार? भाजप पक्षश्रेष्ठींचा प्लॅन काय?
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jul 07, 2022 | 12:40 PM

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज अधिकृतरित्या पदभार स्वीकारलाय. आता तमाम महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष शिंदे यांच्या मंत्रिमंडळाकडे लागलं आहे. शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेल्या आमदार (Shivsena Rebel MLA) आणि मंत्र्यांना भरभक्कम खाती मिळणार, बंडखोरीची फळं कोण-कोण चाखणार, अशा चर्चा रंगू लागल्यात. मंत्रिपद मिळण्यासाठी आमदारांची दिग्गज नेत्यांकडे लॉबिंग सुरु असल्याच्याही चर्चा आहेत. येत्या 11 जुलैनंतर शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळातील खातेवाटप होणार असल्याचं सांगण्यात येत होतं. शिवसेनेने 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई सुरु केली असून आमदारांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) आव्हान दिले आहे. अपात्र आमदारांच्या सदर याचिकेवर 11 जुलै रोजी सुनावणी होईल. यानंतरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील नावं उघडकीस येतील, असं म्हटलं जात होतं. मात्र भाजपमधील सूत्रांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, येत्या 11 जुलैनंतरही खातेवाटपाला मुहूर्त मिळणार नाही. आमदारांना खातेवाटपासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार, अशी चिन्ह आहेत. कारण भाजप पक्षश्रेष्ठींनी आमदारांनी खातेवाटपासाठी मुंबईत येण्याचा काही वेगळाच प्लॅन केल्याची माहिती समोर आली आहे.

भाजप पक्षश्रेष्ठींचा प्लॅन काय?

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली नाहीत. यावर टाइम्स ऑफ इंडियातील पत्रकार प्रफुल्ल मारपकवार यांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे खातेवाटप आणखी 10 दिवसांनी म्हणजेच 17 किंवा 18 जुलै रोजी होईल. याचं कारणही महत्त्वाचं आहे. भाजपकडून राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या 14 जुलै रोजी मुंबईत येत आहेत. मुंबईत त्या आमदार आणि खासदारांची भेट घेतील. या पार्श्वभूमीवर मुर्मू यांचा दौरा महत्त्वापूर्ण आहे. 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे. बहुतांश आमदार यासाठी मुंभईत उपस्थित असतील. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तारही 17 किंवा 19 जुलै रोजी करावा, असा विचार भाजपचे वरिष्ठ नेते करत आहेत. जेणेकरून आमदारांना पुन्हा मुंबईची वारी करण्याचं टळेल.

आधी 12 ते 15 खात्यांचं वाटप?

भाजपमधील वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळातील सर्व 43 खात्यांच्या मंत्र्यांची यादी एकाच दिवशी जाहीर केली जाणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आधी 12 ते 15 खात्यांच्या मंत्र्यांची नावं जाहीर करतील. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनानंतर संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. 18 जुलै रोजी पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार होती, मात्र आता ते 25 जुलै रोजी सुरु होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून विधानसभा अध्यक्ष लवकरच अधिवेशनाची तारीख जाहीर करतील, अशी माहितीही वरिष्ठ भाजप नेत्यांनी दिली.

11 जुलैनंतरही वाट पहावी लागणार

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर 5 जुलै रोजीच मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा होईल, अशी अपेक्षा तमाम जनतेला होती. मात्र जितक्या वेगानं बहुमत चाचणी आणि मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला, तितक्याच धीम्या गतीने मंत्रिमंडळ विस्ताराबाबतचा निर्णय घेतला जातोय. 11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टातील सुनावणी झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे म्हटले जात होते. मात्र भाजपचे नेते त्यानंतरही वेळ काढणार असल्याची माहिती हाती आली आहे. देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावर होते, मुंबईत परतल्यानंतर शिंदे यांच्याशी खातेवाटपाबाबत चर्चा होईल, असे ते नागपूरमध्ये बोलले. दरम्यान, एकनाथ शिंदेदेखील त्यांच्या गावी जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर 10 जुलै रोजी ते पंढरपूरला आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी उपस्थित राहतील. त्यामुळे खातेवाटप कधी होईल, हे सांगता येत नसले तरीही तूर्तास यासाठी काही घोषणा होण्याची शक्यता दिसत नाहीये.

खातेवाटपासाठी दिल्लीचं मार्गदर्शन?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवीन सरकारमधील खातेवाटप ही एवढी सोपी गोष्ट नाहीये. भाजप आणि शिंदे सेनेतील कोणत्या आमदारांना कोणती पदं द्यायची, जेणेकरून भविष्यात हे सरकार अधिक मजबूत स्थितीत राहिल, हेही पाहणं महत्त्वाचं आहे. या मोठ्या निर्णयासाठी शिंदे आणि फडणवीस हे कदाचित दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींचीही भेट घेऊ शकतात, असं म्हटलं जात आहे. त्यानंतरच महाराष्ट्रात खातेवाटपावर शिक्कामोर्तब होईल.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें