नाराज होतील, गावाला जातील, शिंदे दुसरं काय करणार?; दानवेंनी डिवचलं, तर शिरसाट म्हणाले, राजकारणात…
राज्यात महायुतीतील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच जिल्ह्यातील एका कार्यक्रमातून डावलण्यात आले. यावरून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी "शिंदे नाराज होतील, गावाला जातील" असा टोला लगावला. तर मंत्री संजय शिरसाट यांनी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देत, हा मुद्दा कॅबिनेटमध्ये मांडणार असल्याचे सांगितले.

राज्यात महायुती गुण्यागोविंदाने सत्तेत नांदत असल्याचं चित्र असलं तरी हे चित्र वरवरचं असल्याचं दिसून येत आहे. आतून सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपलेली दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल एका कार्यक्रमातून डावलण्यात आलं. त्यामुळे महायुतीतील कुरघोडीचं राजकारण समोर आलं आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एक दोन दिवस शिंदे नाराज होतील. फार फार गावाला जातील. त्याशिवाय दुसरं काय करणार आहेत? असा चिमटा दानवे यांनी काढला. तर या प्रकरणी कॅबिनेटमध्ये आवाज उठवणार असल्याचं राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सांगितलं.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे यांना डिवचले. नवी मुंबई म्हणजे जिल्हा ठाणे येतो. माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ते पालकमंत्री असताना त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांना बोलवले जात नसेल, डावललं जात असेल तर राजकारण कोणत्या दिशेने जात आहे हे कळायला काही हरकत नाही. यांना एकनाथ शिंदे हे नकोच आहेत हे स्पष्ट होतं. नाराज होऊन काय करणार आहेत? दोन-तीन दिवस गावाला जातील, या उपर काय करतील? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे.
एकमेकांची जिरवा…
दरम्यान, आमदारांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. महायुतीत नाराजी तर मोठ्या प्रमाणावर चालूच आहे. त्यांच्या युतीत तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी स्थिती झाली आहे. पाणी आडवा आणि पाणी जिरवा जी योजना होती. तशी एकमेकांची आडवा आणि एकमेकांची जिरवा अशी दोन्ही पक्षांची कुरघोडी सुरू आहे, असा टोला दानवे यांनी लगावला.
राजकारणी बनू नका
दरम्यान, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. काही अधिकारी काही राजकीय लोकांच्या दबावाखाली येऊन असा प्रकार करत असेल तर मी त्यांना ठणकावून सांगतोय तुम्ही तुमच्या नोकरी पुरतं मर्यादित रहा. राजकारणात पडू नका. जर तुम्ही असे राजकारणी होण्याचा प्रयत्न केला तर निश्चित तुमच्यावर सुद्धा कारवाई होईल. हे का घडलं? कसं घडलं? यावर मंगळवारी कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर हा प्रश्न मांडणार आहे, असं शिरसाट म्हणाले.
