दूध दरवाढीच्या मागणीसाठी सदाभाऊ आक्रमक, 10 जून रोजी ‘चाबूक फोड’ आंदोलनाची घोषणा

रयत क्रांती संघटनेकडून 10 जून रोजी दूध दरवाढीच्या मागणीसाठी राज्यभरात चाबूक फोडो आंदोलन करण्यात येणार आहे. तशी माहिती सदाभाऊ यांनी आज सांगलीमध्ये दिली.

दूध दरवाढीच्या मागणीसाठी सदाभाऊ आक्रमक, 10 जून रोजी 'चाबूक फोड' आंदोलनाची घोषणा

सांगली : रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतलीय. दूधाचा भाव वाढवून देण्यासाठी मागणीसाठी सदाभाऊंनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली आहे. रयत क्रांती संघटनेकडून 10 जून रोजी दूध दरवाढीच्या मागणीसाठी राज्यभरात चाबूक फोडो आंदोलन करण्यात येणार आहे. तशी माहिती सदाभाऊ यांनी आज सांगलीमध्ये दिली. त्याचबरोबर कोरोना महामारीचं संकट हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत, हे कोरोनाच्या महालात झोपलेलं भुताटकीचं सरकार असल्याची टीकाही खोत यांनी केलीय. (Sadabhau Khot warns of agitation for increase in milk price)

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुधाला 8 रुपये प्रति लिटर कमी भावमिळत आहे. राज्य सरकारच्या परिपत्रकालाही सहकारी आणि खाजगी दूध संस्थांकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. एकीकडे राज्य सरकारच्या आदेशाचा भंग होत आहे. मात्र, दुसरीकडे दुधाला कमी भाव देणाऱ्या दूध संस्थांवर कारवाई करण्याचं काम दुग्ध विकास विभागाकडून होत नाही. इतकंच नाही तर खाजगी दूध संस्थांवर कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचं सांगण्यात येत आहे. असं असेल तर हा दुग्ध विकास विभागच बंद झाला पाहिजे, अशी टीका खोत यांनी केलीय. दूध खरेदी दरात राज्य सरकारकडून वाढ झाली पाहिजे, या मागणीसाठी 10 जून रोजी रयत क्रांती संघटनेकडून राज्य सरकारच्या विरोधात चाबूक फोड आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा सदाभाऊंनी केलीय. ऊसाच्या एफआरपीप्रमाणे दुधाचा दरही राज्य सरकारने ठरवला पाहिजे, अशी मागणीही खोत यांनी यावेळी केलीय.

‘कोरोनाच्या महालात झोपलेलं हे भुताटकीचं सरकार’

कोरोनाच्या महालात झोपलेलं हे भुताटकीचं सरकार कुणी आंदोलन करणार असेल तर त्याला कोरोनाची भीती दाखवतं. मराठा आरक्षणाबाबतही या सरकारकडून केंद्राला साकडं घालण्याचा उद्योग करण्यात येत आहे. मग गेली दीड वर्षे तुम्ही काय झोपा काढत होते का? ठाकरे सरकारने आता केंद्राऐवजी स्मशानभूमीला साकडं घातलं पाहिजे, अशी जोरदार टीका सदाभाऊ यांनी केलीय.

‘आषाढी वारीला परवानगी द्या- खोत’

पंढरपूरच्या वारी बाबत राज्य सरकारने योग्य ती भूमिका घेऊन परवानगी देणे गरजेचं आहे. कारण राज्यात सगळ्या निवडणुका पार पडत असतील तर आषाढी वारीला काय अडचण आहे ? असा सवाल खोत यांनी केलाय. वारकरी संप्रदायाने यंदा वारी काढण्याबाबतचा निर्णय घ्यावा. रयत क्रांती संघटना त्यांच्यासोबत असेल असा दावाही सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून हिंदू धर्म बदनाम करण्याचा प्रयत्न: सचिन सावंत

मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा; यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Sadabhau Khot warns of agitation for increase in milk price

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI