हिंगोली आढावा : पक्षांतराचे वारे न लागलेल्या जिल्ह्यात परिवर्तनाचे वारे वाहणार?

भागवत धर्माचा अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या संत नामदेव महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी औंढा नागनाथ हे आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील विधानसभांचा आपण आढावा घेणार आहोत.

हिंगोली आढावा : पक्षांतराचे वारे न लागलेल्या जिल्ह्यात परिवर्तनाचे वारे वाहणार?

हिंगोली : भागवत धर्माचा अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या संत नामदेव महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी औंढा नागनाथ हे आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील विधानसभांचा आपण आढावा घेणार आहोत.

हिंगोली जिल्हा मूळ परभणी जिल्ह्यातून 1999 साली वेगळा झाला. हिंगोली जिल्ह्यात 5 तालुके आहेत. या जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी आणि वसमत हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. अवघ्या दोन महिन्यावर निवडणुका आल्याने सर्वच पक्षांनी कंबर कसली तरी 8 लाख 32 हजार 826 मतदान असलेला हिंगोली जिल्हा तसा आघाडीला पसंती देणारा जिल्हा होता. सध्या भाजप, शिवसेना विकासकामे, देशहिताच्या नावाने मतं मागत आहेत. तर आघाडीचे नेते भाजपचा अनागोंदी कारभार, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर समस्यांच्या नावाने मतं मागत आहेत.

शेती हाच जिल्हाचा एकमेव उद्योग असल्याने शेती भोवतीच येथील राजकरण फिरत असते. जिल्ह्यातील हिंगोली आणि कळमनुरी या दोन मतदारसंघात काँग्रेसचा बोलबोला होता,तर वसमतमध्ये राष्ट्रवादीची चलती होती. पण 2014 साली झालेल्या निवडणुकीत परिवर्तन झाल्याचं बघायला मिळालं. 15 वर्ष काँग्रेसचे आमदार असलेले माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांना 56 हजार मतांच्या फरकाने भाजपचे तानाजी मुटकुळे यांच्याकडून हार पत्करावी लागली.

वसमतमध्ये डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार जयप्रकाश दांडेगावकरांना साडे चार मतांच्या फरकाने पराभूत करीत शिवसेनेचा झेंडा लावला.

कळमनुरी विधानसभेत राजीव  सातव लोकसभेवर गेल्याने काँग्रेसचे डॉ, संतोष टारफे यांनी शिवसेनेचे उमेदवार गजानन घुगे यांचा 8 हजार मतांच्या फरकाने पराभव करीत पहिल्यांदा आमदार होण्याचा मान मिळवला.

राजकीय पटलावर हिंगोली जिल्ह्याचा अधिक राजकारण प्रबळ नसले तरी राजीव सातव यांच्या रूपाने जिल्ह्याला नवी ओळख मिळाली आहे. राज्यात सर्वत्र पक्षांतरांचे वारे वाहत असले तरी आज मितीला पक्षांतराचे वारे वाहतांना येथे बघायला मिळत नाहीत.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेशयात्रा नुकतीच येऊन गेली असतांना आघाडीचा कुणी बडा नेता भाजपच्या गळाला लागला नाही.तरीसुद्धा जिल्ह्यात परिवर्तनाचे वारे वाहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आघाडीच्या जागा वाटपात कळमनुरी आणि हिंगोली मतदारसंघ काँग्रेसकडे आहे,तर वसमत मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात आला आहे. युतीच्या जागा वाटपात कळमनुरी आणि वसमत शिवसेनेला सोडण्यात आली आहेत, तर हिंगोली हा एकमेव मतदार संघ भाजपच्या ताब्यात आहे.

भाजप या वेळी कळमनुरी मतदारसंघ शिवसेनेचे माजी आमदार गजानन घुगे जे विधानसभा निवडणुकीनंतर भाजपवाशी झाले होते,त्यांच्यासाठी सोडवून घेण्यासाठी इच्छुक आहे. वसमतमधूनही भाजपचे अड शिवाजी जाधव निवडणुकीची जोरदार तयारी करीत आहेत. आघाडी जवळपास निश्चित मनली जात असली तरी युतीवर येथील निवडणुका अवलंबून आहेत.

पक्षीय बलाबल- हिंगोली जिल्हा

 • हेमंत पाटील –खासदार शिवसेना
 • डॉ. जयप्रकाश मुंदडा- आमदार वसमत, शिवसेना
 • विप्लव बाजोरिया – विधान परिषद सदष्य –शिवसेना
 • तानाजी मुटकुळे – आमदार हिंगोली – भाजप
 • डॉ. संतोष टारफे- आमदार कळमनुरी- आय काँग्रेस
 • रामराव वडकुते – विधान परिषद सदष्य ( राष्ट्रवादी )

हिंगोली विधानसभा 2014 चा निकाल

 • तानाजी मुटकुळे- भाजप – 97 हजार 45, मते विजयी 56 हजार 446
 • भाऊराव पाटील गोरेगावकर – काँग्रेस 40 हजार 599 मते पराभूत
 • दिलीप चव्हाण (राष्ट्रवादी) 21 हजार 897 मते तिसर्याआ स्थानी

हिंगोली विधानसभा मतदार संघातील  2 लाख 86 हजार 531 मतदान

 • पुरुष- 1 लाख 51 हजार 565
 • महिला 1 लाख 34 हजार 966
 • इतर-0

हिंगोली विधानसभा तसा काँग्रेसचा बालेकिल्लाच पण 2014 मध्ये या बाले किल्याला भाजपच्या तानाजी मुटकुळे यांनी सुरुंग लावत पंधरा वर्ष आमदार असलेल्या आणि ज्यांच्या घरात पूर्वापार राजकारण आहे, त्या भाऊराव पाटील गोरेगावकरांना 56 हजार 466  मतांनी पराभूत केले.

हिंगोली विधानसभा मतदारसंघांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक नेत्यांनी विविध कार्यक्रमातून उठ बस वाढलेली आहे. त्यामुळे हिंगोली विधानसभा मतदारसंघ आत्तापर्यंत भाजप आणि काँग्रेस असाच सत्तासंघर्ष झाला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू आहे. या वेळी शिवसेना आणि भाजपची युती होणार का याची उत्सुकता कायम असली तरी  युती झाल्यास भाजपकडेच ही जागा राहणार असून आमदार तानाजी मुटकुळे हेच भाजपचे दुसऱ्यांदा उमेदवार असतील.

माजी खासदार राजीव सातव आणि माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यात विस्तव जात नसल्याने राजीव सातव हिंगोलीतून नवीन उमेदवाराच्या शोधात आहेत.  अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय असलेले माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर मात्र तिकीटावर स्वत:चा दावा सांगतायेत.

तर दुसरीकडे राजीव सातव यांच्या गटाचे सुरेश अप्पा सराफही विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. शिवसेनेकडून हिंगोली मार्केट कमिटीचे सभापती रामेश्वर शिंदे,माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर यांचे सुपुत्र राजेश पाटिल गोरेगांवकर,उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांची नावे रेस मध्ये आहेत. तिकीट न मिळाल्यास ते अपक्ष निवडणूक लढविण्याची ही शक्यता नाकारता येत नाही.

वंचित बहुजन अघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक नुकतीच हिंगोलीत पार पडली  असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी  इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचा चेहरा कोण असणार यावर निकाल अवलंबून असला तरी भाजपला वंचितमुळे फायदा होण्याचीच शक्यता आहे. युती झाल्यास ही निवडणूक काँग्रेसला जड जणार असली तरी स्वबळावर निवडणुका लढल्या गेल्या तर हिंगोलीची निवडणूक रंगतदार होणार आहे.

  वसमत विधानसभा (Basmat Vidhan Sabha constituency)

वसमत विधानसभेत शिवसेनेचे माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा हे आमदार आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्र म्हणून वसमत तालुक्याची ओळख आहे. सुपीक शेती आणि दर्जेदार हळदीचं उत्पादन, यासाठी वसमत तालुका प्रसिद्ध आहे. गांधीवादी क्रांतिकारी गंगाप्रसाद अग्रवाल आणि कापूस आंदोलनात छातीवर गोळ्या झेलणारे बहिर्जी शिंदे यांचा हा चळवळीचा क्रांतिकारी तालुका आहे. आलटून पालटून संधी देणारा हा विधानसभा मतदार संघ आहे.

लोकसभा निवडणुका संपताच या मतदारसंघात राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. येथे शिवसेनेचे माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा हे आमदार आहेत. त्यांनी 2014 मध्ये स्वबळावर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये झालेल्या मारठ्यांच्या मतांच्या विभागणीत, राष्ट्रवादीचे तेव्हाचे आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांचा 5 हजार 556 मतांनी पराभव करीत तिसऱ्यांदा आमदार बणण्याचा मान मिळवला.

शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील आणि वसमतचे विद्यमान आमदार डॉ. मुंदडा या दोघांमध्ये लोकसभेच्या कमावरून अंतर्गत कलह सुरू आहे. एकनिष्ठ असलेल्या आमदार मुंदडा यांचं तिकीट शिवसेनेकडून पुन्हा एकदा निश्चित मानलं जात असलं तरी हेमंत पाटील काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांच लक्ष असणार आहे.

जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुश आहेर, राजू चापके माजी नगराध्यक्ष सुनील काळे आणि वसमतचे शिवसेनेना तालुकाप्रमुख बालाजी तांबोळी आमदारकी लढविण्यास इच्छुक आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी निश्चित मानली जात असली तरी काँग्रेस कडून इच्छुकांनी मुलाखती दिल्यायेत. काँग्रेसकडून वैद्यकीय व्यवसाय डॉ.एम.आर.क्यातमवार  यांनी मुंबई येथे जाऊन पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारी माघितली आहे. त्यांनी मागील पाच वर्षापासून मतदारसंघात काम ही सुरू केलं आहे. विशेष म्हणजे आघाडीत वसमत मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे.

राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी प्रबळ दावेदारी असताना बाजार समितीचे माजी सभापती राजू नवघरे यांनी वसमत विधानससभेवर आपला दावा केलाय. पक्षाने घेतलेल्या मुलाखतीपूर्वी नवघरे यांनी शक्तिप्रदर्शन करीत मुलाखत दिलीय. त्यांना तिकीट न दिल्यास ते बंडखोरी करणायची शक्यता नाकारता येत नाही.

दुसरीकडे भाजप नेते तथा टोकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे विधिज्ञ शिवाजी जाधव यांनी विधानसभेत काम सुरू केलं असून, युतीत असलेली जागा भाजपला सोडवून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

मागील निवडणुकीत जाधव यांनी 51 हजार मते घेऊन तिसरा क्रमांक पटकावत त्रिशंकू लढत केली होती.  यावेळी भाजपचे वारे वाहत असल्याने जाधव यांच्या बद्दलच्या सहानुभूतीने भाजपने येथील जागा  सोडवून घेतल्यास जिंकू शकणार आहे. त्यांना जागा न सोडल्यास शिवाजी जाधव विरोधकाच्या किंवा इतर पर्याय घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यात आहे. कारण ते अपक्ष म्हणून लोकसभा लढवणार असतांना भाजपाणे शब्द दिल्याने त्यांनी लोकसभेतून माघार घेतली होती.

भाजप युती झाल्यास मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडण्याचे संकेत आहेत, लोकसभा निवडणुकीत अनेकांना घाम फोडलेल्या वंचित बहुजन आघाडीची विधानसभा निवडणुकीतही एंट्री होत असल्याने सर्वच पक्षप्रमुखांच्या भुवया उंचावल्या आहेत. हिंगोली येथे नुकत्याच झालेल्या पक्षाच्या मुलाखती मध्ये  वसमत येथील उद्योजक वसंतराव खंदारे,प्रभावती खंदारे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांचे चिरजीव तथा जवळा बाजारचे सरपंच फैजल पटेल  यांच्यासह तब्बल बारा इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत.त्यामुळे वंचित आघाडीचा उमेदवार कोण ठरतो यावर येथील निवडनुकीची रंगत अवलंबून असणार आहे

 92 वसमत विधानसभा मतदार संघ

 • 2 लाख 63 हजार 228 मतदान
 • पुरुष 1 लाख 38 हजार 844
 • महिला 1 लाख 24 हजार 384 नि वियजयी
 • इतर 0

2014 ला पडलेली मते

 • डॉ.जयप्रकाश मुंदडा शिवसेना, 63 हजार 851 मते ,
 • जयप्रकाश दांडेगावकर राष्ट्रवादी, 58 हजार 295 मते पराभूत
 • अँड.शिवाजीराव जाधव भाजपा, 51 हजार 197 मते तिसर्याच स्थानी
 • डॉ.जयप्रकाश मुंदडा शिवसेना, 5 हजार 556 मतांनी विजयी

कळमनुरी विधानसभा लेखाजोखा (Kalamnuri Vidhan sabha)

काँग्रेसचे डॉ. संतोष टारफे हे विद्यमान आमदार आहेत.

कळमनुरी हे औंढा नागनथाचे पवित्र स्थान असलेला मतदारसंघ,विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरचा कळमनुरी तालुका, कळमनुरी आणि औंढा नागनाथ तालुक्याचा मिळून हा मतदार संघ तयार करण्यात आला आहे. या मतदारसंघात मागील चार निवडणुकात दोन वेळेस शिवसेना आणि दोनदा काँग्रेसने बाजी मारली आहे.

सध्या या मतदारसंघात शिवाजीराव मोघे यांचे जावई डॉ. संतोष टारफे हे काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांनी शिवसेनेचे माजी आमदार गजानन घुगे यांना 10 हजार 436 मतांनी पराभूत केले होते. काँग्रेसकडून त्यांनाच उमेदवारी निश्चित मानली जात आहे. जर खासदार राजीव सातव राज्याच्या राजकारणात परत आले नाहीत तर, युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे असली तरी यापूर्वी रासपकडे होती त्यामुळे रासपचे नेते तथा मराठा शिवसैनिक सेनेचे अध्यक्ष विनायक भिसे यांनी या विधानसभेवर आपला दावा सांगितला आहे.

मागील दहा वर्षापासून शिवसेना ही जागा गमावत असल्याने, रासप या जागेवर दावा करतेय. ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी पक्षाचे नेते महादेव जानकर स्वत: इच्छुक असून तसे त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

पहिल्यांदाच कळमनुरी विधानसभेमध्ये भाजप एण्ट्री करू इच्छित असून भाजपकडून तिकिटासाठी दिग्गज नेत्यांची फळी आहे. माजी खासदार शिवाजी माने, कळमनुरीचे दोनदा आमदार राहिलेले माजी आमदार गजानन घुगे,जिल्हा उपाध्यक्ष तथा पाटबंधारे विभागातील निवृत्त अभियंते पी.आर.देशमुख ,संजय काकडे,डॉ.जयदीप  देशमुख,  दिनकर कोकरे यांनी कळमनुरीतुन उमेदवारी माघितली आहे. तर शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख संतोष बांगर तयार करीत आहेत.

त्याव्यतिरिक्त जिल्हा परिषदेचे उपसभापती गोपू पाटील,नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे पक्षाकडे उमेदवारी माघत आहेत. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने कळमनुरी विधानसभे मध्ये धमाकेदार प्रदर्शन केले त्यानंतर वंचित आघाडीकडून अपक्ष जिल्हा परिषद सदस्य अजित मगर,जिया कुरेशी, रवी शिंदे,एम,आयएमचे जिल्हाध्यक्ष हाजी बुरान पहेलवान,अब्दुल हाफिज फारूकी  वंचित कडून आमदार होऊ पाहत आहेत.

तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही कळमनुरी मतदारसंघावर दावा केला असून राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, खाजा बागवान विधानसभेवर दावा करीत आहेत.

93 कळमनुरी विधानसभा (Kalamnuri Vidhan sabha)

 • 2 लाख 83 हजार 67 मतदार
 • पुरुष 1 लाख 50 हजार 250
 • महिला 1 लाख 32 हजार 817
 • इतर 0

2014 ला पडलेली मते

 • डॉ. संतोष टारफे कॉग्रेस, 67 हजार 104 मते
 • मा.आ. गजानन घुगे शिवसेना, 56 हजार 568 मते
 • अँड.मा.खा.शिवाजीराव माने ,राष्ट्रवादी 38 हजार 085 मते
 • काँग्रेसचे डॉ. संतोष टारफे 10 हजार 436 मतांनी विजयी.

या तीन ही मतदार संघात मूलभूत सोयी सुविधांची वाणवा असून आमदारांनी दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाहीत. रस्ते पाणी रोजगार शिक्षण आरोग्य ह्या जुन्याच समस्या तशाच आहेत. युती- आघाडी झाल्यावरच मतदार कुणाच्या बाजूने कौल देतो हे सांगणं शक्य होणार आहे. युती न झाल्यास आणि वंचितच्या एण्ट्रीने निवडणुकीत रंगत येणार आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI