केजरीवालांच्या कानशिलात का मारली? हल्लेखोर तरुण म्हणतो…

केजरीवालांच्या कानशिलात का मारली? हल्लेखोर तरुण म्हणतो...

नवी दिल्ली : “मी मुख्यमंत्री केजरीवाल यांना थप्पड का लगावली, मला माहीत नाही”, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करणाऱ्या तरुणाने सांगितलं. सुरेश नावाच्या या तरुणाने गेल्या 4 मे रोजी केजरीवाल यांना प्रचारादरम्यान त्यांच्या गाडीवर चढून थप्पड लगावली होती. त्यानंतर या तरुणाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. “तिथे काय झालं हे मला समजलचं नाही. तुम्ही विचारत आहात की मी असं का केलं. आता ज्या व्यक्तीला स्वत:लाच हे माहीत नाही की त्याने असं का केलं, तो तुम्हाला उत्तर कसं देणार”, असं सुरेशने सांगितलं. तसेच, त्याच्या या कृत्यावर त्याला पश्चात्ताप होत आहे, असेही त्याने सांगितलं.


सुरेश नेहमीच अशा रॅलीमध्ये, कार्यक्रमांमध्ये जात असतो. पण, याआधी त्याने कधीही असं काही केलेलं नाही, असंही सुरेशने सांगितलं. तो पुन्हा कधीही अशा प्रकारची वर्तणूक करणार नसल्याची ग्वाही त्याने मीडियासमोर दिली. तसेच, तो कुठल्याही राजकीय पक्षाच्या संपर्कात नसल्याचंही त्याने यावेळी स्पष्ट केलं.

प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा हल्ला

नवी दिल्ली येथे 4 मे रोजी अरविंद केजरीवाल हे पश्चिम दिल्ली मतदारसंघातील मोती नगरमध्ये आपचे उमेदवार बलबीर सिंग यांचा प्रचार करत होते. हा रोड शो सुरु असतानाच सुरेशने ओपन जीपमध्ये चढून केजरीवालांना थप्पड लगावली. यानंतर सुरेशला पोलिसांनी अटक केली. 33 वर्षीय सुरेश हा दिल्लीतील एक स्पेअर पार्ट विक्रेता आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर हल्ला होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2014 मध्ये असाच एक प्रकार घडला होता. दिल्लीतील दक्षिणपुरी भागात रोड शो सुरु असताना एक तरुण ओपन जीपवर चढला आणि त्याने केजरीवाल यांच्यावर हल्ला केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री असलेल्या केजरीवालांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पाहा व्हिडीओ :

Published On - 10:57 am, Fri, 10 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI