याकूब मेमनची फाशी रद्द करा सांगणारे तीन महापुरूष… त्यांच्याच मतदारसंघातील यादी तपासा; मंगलप्रभात लोढा कडाडले
Mangalprabhat Lodha: विरोधकांकडून मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप केला जात आहे. यावर आता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी याकूब मेमनची फाशी रद्द करा असं सांगणाऱ्या 3 महापुरुषांच्या मतदार याद्या तपासा असं म्हटलं आहे.

विरोधकांकडून मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप केला जात आहे. याविरोधात आज मुंबईत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विरोधी पक्षातील नेत्यांनी मतदार यादीतील घोटाळ्यांवर भाष्य केले. यावर आता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी याकूब मेमनची फाशी रद्द करा असं सांगणाऱ्या 3 महापुरुषांच्या मतदार याद्या तपासा असं म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मतदार यादीत 5 हजार रोहिंग्या बांग्लादेशी सापडतील
मंगलप्रभात लोढा यांनी, ‘मतदार यादीत घोळ आहे, असं ते म्हणतात. मी त्यांचे समर्थन करतो. याकुब मेमनची फाशी रद्द करावी, असे तीन आमदार व महापुरुष होते. अबु आझमी, नसिम खान, अमिन पटेल या महापुरुषांच्या मतदारसंघातील यादी तपासा. त्यांच्या मतदार यादीत किमान 5 हजार रोहिंग्या बांग्लादेशी दिसतील. जर नाही मिळाले तर मी राजीनामा देईल, जर मिळाले तर तुम्ही राजीनामा द्या असे विधान केले आहे.
मुंबईत देवेंद्र फडणवीस यांचा विकासाचा पॅटर्न चालेल
पुढे बोलताना लोढा यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, मुंबईच्या दुर्दशेला उद्धव ठाकरे कारणीभूत आहेत. स्टँडिंग कमिटी लुटून खाल्ली. मी दोन दिवसात निवडणूक आयोगाची भेट घेईल. विरोधकांनी केलेल्या मागणीनुसार मी मतदार यादी तपासण्यासाठी सांगणार आहे. कुणी बांग्लादेशी घुसवले, रोहिंग्यांना घेतले हे तपासले जाणार आहे. मी मालाड मध्ये जनता दरबार घेतला. मालाड मालवणी विधानसभेत 22 हजार 428 अनधिकृत बांधकामे आहेत. 82 एकर सरकारी जमीनीवर अनधिकृत बांधकामे केली. मुंबईकरांना मी आवाहन करतो, मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, हे सांगा. मालवणी पॅटर्न, याकुब मेमन पॅटर्न मुंबईत चालणार नाही. देवेंद्र फडणवीस यांचा विकासाचा पॅटर्न मुंबईत चालेल.
रवींद्र चव्हाण यांची विरोधकांवर टीका
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विरोधकांच्या मोर्चावर बोलताना म्हटले की, काँग्रेस सारख्या महत्वाच्या पक्षाने या मोर्चातून अंग काढून घेतले. गेल्या एक महिन्यातून त्यांच्याकडून काय करायचं आहे याबाबत भूमिका स्पष्ट नाही. महाविकास आघाडी बिघाडी आहे. ही सर्व मंडळी, ठाकरे बंधू फार मोठे नेते, परंतु त्यांच्या मानसिकता लक्षात घ्या, वर्षानुवर्षे जनतेला भावनिक आव्हान करून जनतेला गुरफटून ठेवलं. महाराष्ट्र आणि त्याची अस्मिता यावर फक्त त्यांनी भाषण केली, वक्तृत्वावर असलेल्या कमांडच्या जोरावर ठाकरेंनी महाराष्ट्राला वाईट दिवस दाखवले असा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.
