आघाडीच्या धसक्यानं प्रदेशाध्यक्षपद घेण्यास भाजपमधील दिग्गजांची माघार?

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेक नावांची चर्चा झाली (Election of BJP State president). मात्र, आता ऐनवेळी भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीतून अनेक नेत्यांनी माघार घेतल्याचं बोललं जात आहे.

आघाडीच्या धसक्यानं प्रदेशाध्यक्षपद घेण्यास भाजपमधील दिग्गजांची माघार?

मुंबई : सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पुढे येऊनही आमदार निवडून येऊनही भाजपवर विरोधात बसण्याची वेळ आली. विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि राम शिंदेंसारख्या अनेक दिग्गजांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेक नावांची चर्चा झाली (Election of BJP State president). मात्र, आता ऐनवेळी भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीतून अनेक नेत्यांनी माघार घेतल्याचं बोललं जात आहे. या नेत्यांनी महाविकासआघाडीच्या धसक्यानेच माघार घेतल्याचंही बोललं जात आहे (Election of BJP State president).

भाजपच्या प्रदेशाध्यपदाची 15 जानेवारीला निवड होणार आहे. मात्र, यासाठी शर्यतीत असणाऱ्या अनेक दिग्गजांनी यू टर्न घेतल्यानं चंद्रकांत पाटलांनाच पुन्हा प्रदेशाध्यक्ष केलं जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे याआधी प्रदेशाध्यक्षपदासाठी सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रेशखर बानवकुळे अशी मोठी नावं चर्चेत होती. संघाच्या जवळच्या नेत्यांकडेच प्रदेशाध्यपद द्यावं, असा संघ नेत्यांचा सूर आहे. मात्र चंद्रकांत पाटील अमित शाहांच्या जवळचे असल्यानं पाटलांचीच वर्णी लागणार असल्याचं बोललं जातंय.

शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आता यापुढंही महाविकासआघाडीचाच फॉर्म्युला आगामी निवडणुकांमध्ये राबवणार असल्याचं तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतही त्याचा परिणामही दिसला. त्यानंतरच महाविकास आघाडीच्या धसक्यानं प्रदेशाध्यक्षपद घेण्यास भाजपच्या दिग्गजांनी माघार घेतली की काय अशी शंका राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाची या पदासाठी जोरदार चर्चा सुरु होती, अशातच अचानक त्यांचंही नाव यातून बाहेर पडलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष असतानाच भाजपला सत्तेतून बाहेर राहावं लागलं. यानंतरही पुन्हा त्यांच्याकडेच प्रदेशाध्यक्षपद देण्यास अनेक नेत्यांचा आक्षेप असल्याचंही बोललं गेलं. तसेच भाजपमधील एका गटाकडून या अपयशाची जबाबदारी घेऊन राज्यातील नेतृत्वाने आपली पदं सोडावीत, अशीही मागणी केल्याची चर्चा आहे.

Published On - 11:08 pm, Sat, 11 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI