उद्धव ठाकरे मराठाद्वेषी; ते मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही: नितेश राणे

उद्धव ठाकरे हे ‘सामना’ दैनिकाचे संपादक असताना त्यांनी मराठा मोर्चाची ‘मुका मोर्चा’ अशी हेटाळणी केली होती. | Nitesh Rane

  • रमेश चेंडके, टीव्ही 9 मराठी, हिंगोली
  • Published On - 19:51 PM, 26 Nov 2020
BJP MLA Nitesh Rane take a dig at Shivsena over MLC election Maharashtra 2020 results

हिंगोली: उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे मराठाद्वेषी आहेत. ते जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत तोवर मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले. मराठा आरक्षण किंवा धनगर आरक्षण हा ठाकरे सरकारसाठी प्राधान्याचा मुद्दा नसल्याचा आरोपही यावेळी नितेश राणे यांनी केला. (BJP leader Nitesh Rane slams CM Uddhav Thackeray over Maratha reservation issue)

नितेश राणे यांनी गुरुवारी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारासाठी हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे हे ‘सामना’ दैनिकाचे संपादक असताना त्यांनी मराठा मोर्चाची ‘मुका मोर्चा’ अशी हेटाळणी केली होती. आमच्या मायबहिणींना अपमानित केले होते. मुळात मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण हे राज्य सरकारसाठी प्राधान्याचे मुद्दे नाहीत. त्यामुळे हे सरकार घालवल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असे नितेश राणे यांनी सांगितले.

यापूर्वी फडणवीस सरकारच्या काळात मुंबई उच्च न्यायालयात सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गातंर्गत (SEBC) मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाला मंजुरी मिळाली होती. मात्र, सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यामुळे राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे.

मराठा आरक्षणाच्या तिढ्यामुळे राज्यातील अकरावीची प्रवेशप्रक्रियाही रखडली होती. मात्र, राज्य सरकारने बुधवारपासून ही प्रक्रिया पुन्हा सुरु केली होती. SEBC प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला होता. त्यामुळे मराठा आंदोलकांच्या नाराजीत आणखीनच भर पडली होती.

28 नोव्हेंबरला मराठा आंदोलकांची मशाल रथयात्रा

मराठा आरक्षणासाठी आता मराठा क्रांती मोर्चाकडून (Maratha Kranti Morcha) मशाल रथयात्रा काढण्यात येणार आहे. औरंगाबाद ते मुंबईतील आझाद मैदान अशी ही रथयात्रा असेल. येत्या 28 तारखेला ही मशाल रथयात्रा औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने कूच करेल. कोपर्डी आणि शिवनेरी किल्ल्याच्या मार्गाने ही रथयात्रा मार्गक्रमण करेल, असे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या:

डान्सबारच्यावेळी चार वेळा अध्यादेश काढले, मग मराठा आरक्षणाच्या बाबतीत का नाही? मराठा क्रांती मोर्चाचा सवाल

मराठा आरक्षणाचा प्रश्न तेवत ठेवायचा आहे, त्यामुळेच सरकारकडून वेळकाढूपणा; प्रवीण दरेकरांची टीका

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

(BJP leader Nitesh Rane slams CM Uddhav Thackeray over Maratha reservation issue)