‘परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु’, रोहित पवारांचा सरकारला घरचा आहेर

एकाच दिवशी दोन परीक्षा आल्यानं परीक्षार्थींना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. शासनाने संबंधित कंपनीला आदेश देऊन परीक्षा केंद्र बदलण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. सगळ्या परीक्षा MPSC मार्फतच घ्या अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

'परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु', रोहित पवारांचा सरकारला घरचा आहेर
आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस


पुणे : आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन सावळा गोंधळ सुरुच आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. परीक्षा घेणाऱ्या कंपन्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करत आहेत. एकाच दिवशी दोन परीक्षा आल्यानं परीक्षार्थींना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. शासनाने संबंधित कंपनीला आदेश देऊन परीक्षा केंद्र बदलण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. सगळ्या परीक्षा MPSC मार्फतच घ्या अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. सगळ्या परीक्षार्थींना एसटीचा प्रवास मोफत करु देण्याची मागणीही त्यांनी दिली आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन सुरु असलेल्या गोंधळावरुन रोहित पवार यांनी सरकारकडे या महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. (MLA Rohit Pawar’s advice to Mahavikas Aghadi government on the management of Examination companies)

रोहित पवार यांनी ट्वीट करुन राज्य सरकारला सल्ला दिलाय. एकाच दिवशी दोन परीक्षांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्याने अनेकांना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. शासनाने परीक्षा घेणाऱ्या कंपनीला संबंधित अडचण सोडवण्याचे निर्देश तत्काळ द्यावेत आणि मदत केंद्र सुरू करून परीक्षार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र रिअलोकेट करावेत. तसंच कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा पुढं ढकलू नये. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी फी न घेता प्रत्येक परिक्षार्थ्याकडून एकाच पदाची फी घ्यावी. शिवाय पहिल्या वेळी परीक्षा रद्द झाल्याने आता सर्व परीक्षार्थींना परीक्षेला जाण्यासाठी एसटीचा प्रवास मोफत करायला हवा, असं रोहित पवार यांनी म्हटलंय.

‘येत्या काळात सर्व परीक्षा एमपीएससी मार्फतच घ्या’

उमेदवार मोठ्या कष्टाने अभ्यास करतात आणि आई-वडील पदरमोड करुन मोठ्या आशेने मुलांचा खर्च करतात, पण परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नाही. म्हणून कृपया येत्या काळात सर्व परीक्षा एमपीएसी मार्फतच घेण्यात याव्यात, ही कळकळीची विनंतीही रोहित पवार यांनी केलीय.

आरोग्य विभागाच्या परीक्षांमधला गोंधळ संपता संपेना !

24 आणि 31 तारखेला आरोग्य विभागाची गट क आणि गट ड ची परीक्षा होणार आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या संवर्गातील अर्ज उमेदवारांनी भरले आहेत. मात्र, सगळ्या संवर्गाची परीक्षा एकाच दिवशी आल्यानं दोन परीक्षांचे अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांला एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. जिल्हा बदलून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र मिळाल्याचंही समोर आलं आहे. तर, प्रवेशपत्रावरील पिनकोडही चुकीचं आल्याची विद्यार्थ्यांची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. यापूर्वी तांत्रिक गोंधळामुळे आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलली होती. यावरुन विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती.

गट क ची परीक्षा 24 ऑक्टोबर तर गट ड ची परीक्षा 31 ऑक्टोबरला

आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांनी मनस्ताप व्यक्त केला होता. 24 ऑक्टोबर गट क ची परीक्षा तर गट ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. या दोन्ही दिवशी रविवार असल्यानं शाळा उपलब्ध होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली होती. राजेश टोपे यांनी यावेळी 9 दिवस आधी हॉलतिकीट दिले जाईल, अशी देखील माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका कुठलेही चुकीचे काम होऊ देणार नाही, असं म्हटलं होतं.

गोपीचंद पडळकरांचं महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नोकर भरतीच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवलाय. काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागानं कोणतीही पूर्वसूचना न देता आपली परीक्षा रद्द केली होती. कोरोनाच्या संकटात विद्यार्थी कसेतरी परीक्षा केंद्रावर पोहोचले होते. त्यांना माघारी पाठवलं होतं. सरकारी भरतीच्या परीक्षांमध्ये सावळा गोंधळ घालण्याची सवयच या सरकारला लागली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षाही त्यांनी सहा वेळा पुढं ढकलली होती. विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत, याचं गांभीर्य सरकारला नाही, असा घणाघात पडळकर यांनी केलाय.

प्रशासनात आणि सरकारमध्ये कसलाच ताळमेळ नाही. इतकं होऊन पुन्हा नव्या होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या तारखेत गोंधळ घातलाय. एकाच दिवशी दोन परीक्षा दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात ठेवण्यात आल्या आहेत. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांचा परीक्षांना समोर जाण्याचा अधिकारच नाकारत आहेत. त्यांची संधी नाकारली जात आहे. एकतर हे वसुली सरकार नोकर भरती काढत नाही. काढली तर असा गोंधळ घालतं. सरकारच्या या गलथान कारभारामुळे स्वप्नील लोणकर सारख्या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला. पण या प्रस्थापितांचं सरकार निर्लज्जासारखं वावरत असल्याचा हल्लाबोलही पडळकर यांनी केलाय.

इतर बातम्या :

नंदुरबार झेडपी पोटनिवडणुकीत भाजपला फटका, आता महाविकास आघाडीत सभापतीपदावरुन रस्सीखेच!

शरद पवारांवर एकेरी भाषेत टीका, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून चंद्रकांत पाटलांना ‘नवरत्न तेलाची बाटली’ गिफ्ट!

MLA Rohit Pawar’s advice to Mahavikas Aghadi government on the management of Examination companies

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI