मनसे आणि भाजपची युती होणार का? राज ठाकरेंचा एकमेव आमदार म्हणतो…

राज्यातील राजकारणात नवी समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे. मंगळवारी (7 जानेवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर भाजप-मनसेच्या युतीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

मनसे आणि भाजपची युती होणार का? राज ठाकरेंचा एकमेव आमदार म्हणतो...

मुंबई : राज्यातील राजकारणात नवी समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे. मंगळवारी (7 जानेवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर भाजप-मनसेच्या युतीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे (MNS MLA Raju Patil on MNS BJP Alliance). यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसेचे एकमेव आमदार असलेल्या राजू पाटील यांनी देखील मनसे आणि भाजप एकत्र येऊ शकते असं सूचक वक्तव्य केलं आहे (MNS MLA Raju Patil on MNS BJP Alliance).

आमदार राजू पाटील म्हणाले, “सभागृहामधील परिस्थिती आपण बघत आहात. त्यामुळे भविष्यात मनसे भाजप एकत्र येऊ शकतात. सध्या जे राजकारण सुरू आहे ते तुम्ही पाहत आहात. मात्र, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये काय घडलं याची कल्पना नाही.”

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नसल्याची प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्त भेटीनंतर राजकीय घडामोडींना बराच वेग आला आहे. दोन्ही नेत्यांनी कोणतीही वाच्यता न करता अत्यंत गोपनियता ठेऊन नेमकी काय चर्चा केली याविषयी देखील तर्क लावले जात आहेत. प्रभादेवी येथील हॉटेल इंडिया बुल्स स्कायमध्ये जवळपास दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस हे हॉटेलच्या पुढील दाराने, तर राज ठाकरे मागील दाराने बाहेर पडले. कुणीही माध्यमांशी चर्चा केली नाही.

राज ठाकरे या बैठकीसाठी कोणत्याही सुरक्षा रक्षकाशिवाय आले होते. देवेंद्र फडणवीस यांनीही या बैठकीबाबत मोठी गोपनीयता बाळगली होती. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे मित्र गुरुप्रसाद रेगे हेही या बैठकीला उपस्थित होते. या भेटीनंतर राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मित्र गुरुप्रसाद रेगे हे देवेंद्र फडणवीस यांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी खाली आले. याचेही अनेक अर्थ काढले जात आहेत.

शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने आता मनसेसाठी आपला राजकीय अवकाश मिळवण्याचं आव्हान आहे. म्हणूनच भाजपच्या मदतीने आपली जागा मिळवण्याच्या पर्यायावर मनसे विचार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मनसेचं येत्या 23 जानेवारीला महाअधिवेशन होणार आहे. मनसेचं त्यांच्या कारकिर्दीतील हे पहिलं अधिवेशन आहे. या अधिवेशनात राज ठाकरे कोणती भूमिका जाहीर करणार याकडे मनसैनिकांचं लक्ष लागलं आहे.


Published On - 2:30 pm, Wed, 8 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI