राज ठाकरेंच्या उपस्थितीत ठाण्यात मनसेचं शिबीर, विधानसभेच्या तयारीला सुरुवात

राज ठाकरेंच्या उपस्थितीत ठाण्यात मनसेचं शिबीर, विधानसभेच्या तयारीला सुरुवात

ठाणे : लोकसभा निवडणुकीत राजकीय वातावरण ढवळून निघाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.  लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे आता राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. यासाठी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा आजच्या राज्यस्तरीय शिबिरात राज ठाकरे स्वतः घेणार आहेत. हे शिबीर सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत मनसेचे नेते, सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांसाठी पुढील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचं असल्याचं मनसेच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांना हटवण्यासाठी झंझावात उभा करण्याचा प्रयत्न केला. यासाठी राज ठाकरे यांनी मुंबईसह राज्यात 10 सभा घेतल्या. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढवता प्रचाराच्या रणधुमाळीत आघाडी घेतली. त्यामुळे राज ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात जनतेचा पाठिंबा मिळाला होता. चार महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभेसाठी राज ठाकरेंनी पक्षबांधणी सुरु केली आहे.

ठाण्यातील शिबिराच्या निमित्ताने राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून, विधानसभा निवडणुकीत कशा प्रकारे प्रचार करावा, कोणते मुद्दे घ्यावे आणि संघटनात्मक पातळीवर नेतृत्व बदलाच्या हालचालीबाबतही चर्चा केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरातील मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण केलं होतं. मनसे कार्यकर्त्यांचा हा उत्साह कायम ठेवण्याचा प्रयत्न या शिबिरातून केला जाईल.

मनसेच्या या शिबिरासाठी मनसेचे नेते, पक्षाचे उपाध्यक्ष, सरचिटणीस,  जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, महापालिका-नगरपालिका क्षेत्रातील शहराध्यक्ष, मुंबई, पुणे, नाशिक शहरातील विभाग अध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य या सर्वांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील सध्याची दुष्काळाची स्थिती काय आहे याची माहिती देण्यास सांगितलं आहे. राज ठाकरे दुष्काळाच्या मुद्द्यावर काय बोलतात याकडे लक्ष लागलंय.

विरोधकांचाही दुष्काळ दौरा

विधानसभा निवडणूक तोंडावर आहे आणि राज्यात भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षही ग्रामीण भागात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. राष्ट्रवादीनंतर काँग्रेसनेही आता दुष्काळ दौऱ्याचं नियोजन केलंय. विदर्भातील सहा जिल्ह्यात काँग्रेसच्या 11 आमदारांकडून पाहणी केली जाईल. बुलडाणा जिल्ह्यातून या दौऱ्याला सुरुवात होईल. 13 मे रोजी बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळाची पाहणी केली जाईल.

Published On - 9:10 am, Mon, 13 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI