‘मातोश्री’बाहेर आंदोलनाचा इशारा, राणा दाम्पत्य मुंबईच्या दिशेला रवाना होण्याआधीच पोलिसांचा घेराव

रेल्वे स्टेशनवर जाण्यापूर्वीच नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या निवासस्थानाला पोलिसांनी घेराव घातला (MP Navneet Rana and MLA Ravi Rana protest outside commissioner office).

  • सुरेंद्रकुमार आकोडे, टीव्ही 9 मराठी, अमरावती
  • Published On - 20:29 PM, 15 Nov 2020

अमरावती : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थासमोर उद्या (16 नोव्हेंबर) आंदोलन करण्याचा इशारा राणा दाम्पत्यांनी दिला होता. मात्र, रेल्वे स्टेशनवर जाण्यापूर्वीच नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या निवासस्थानाला पोलिसांनी घेराव घातला. त्यानंतर पोलिसांनी राणा दाम्पत्याला पोलीस आयुक्तालयात दाखल केले. पोलिसांच्या या कारवाईविरोधात राणा दाम्पत्याने पोलीस आयुक्त कार्यालयाच्या पायरीवर आंदोलन पुकारलं  (MP Navneet Rana and MLA Ravi Rana protest outside commissioner office).

विदर्भातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी, लॉकडाऊन काळातील विजेचे बिल निम्मे माफ करावे, या मागणीसाठी नवनीत राणा आणि रवी राणा शेतकर्‍यांसह आज मुंबईसाठी निघणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांना अमरावती पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस आयुक्तालयात दाखल केले (MP Navneet Rana and MLA Ravi Rana protest outside commissioner office).

राणा दाम्पत्याला पोलीस आयुक्तालयात आणताच आपल्याला कोणत्या गुन्ह्याखाली ताब्यात केलं? असा प्रतिसवाल करत त्यांनी पोलीस आयुक्तालयाच्या पायऱ्यांवरच आंदोलन सुरु केलं. तीन दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनी याच मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे चक्काजाम आंदोलन केलं होतं. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आमदार रवी राणा आणि त्यांसह आंदोलनात सहभागी झालेले काही शेतकरी अमरावती मध्यवर्ती कारागृहातून आज जामिनावर सुटले. ते आज मुंबईला रवाना होणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

रवी राणा आणि शेतकऱ्यांच्या अटकेचा फडणवीसांकडून निषेध

दरम्यान, रवी राणा यांच्या अटकेचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला होता. ‘शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी सुद्धा जेलभरो आंदोलन केले. आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळीच्या दिवशी कारागृहात आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो’, अशा शब्दात रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीस यांनी काल ट्विटरवरुन निषेध नोंदवला होता.

खासदार नवनीत राणा यांचं कारागृहाबाहेर धरणं

खासदार नवनीत राणा शनिवारी आमदार रवी राणा यांना भेटण्यासाठी कारागृहात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना भेटू देण्यात आलं नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेरच धरणं धरलं. त्यावेळी नवनीत राणा यांची पोलिसांसोबत बाचाबाचीही झाली. जोपर्यंत रवी राणा यांची भेट होणार नाही तोपर्यंत कारागृहाबाहेर धरणे आंदोलन सुरु राहणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. तर दुसरीकडे पोलिसांनी अटक केल्यानंतर आमदार रवी राणा यांनी कारागृहात अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या :

आमदार रवी राणांसह शेतकऱ्यांची कारागृहातून सुटका, सोमवारी हजारो शेतकऱ्यांसह ‘मातोश्री’वर धडक देणार!

आमदार रवी राणांसह 18 शेतकऱ्यांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल; राणांची रात्र तिवसा पोलीस ठाण्यात

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, आमदार रवी राणांसह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक