मुख्यमंत्रिपदाबाबत न दिलेलं वचन लक्षात, पण बांधावर शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाचं काय? : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असतानाही अतिवृष्टीचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला होता. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात 25 हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली होती. आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात मात्र अत्यंत तोकडी मदत जाहीर करण्यात आल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलेल्या वचनाचं काय झालं? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:10 PM, 28 Nov 2020
graduate and teachers constituency elections 2020 in Maharashtra Maha Vikas Aghadi may get defeated by BJP exit poll prediction

मुंबई : अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी रुपयांची घोषणा केली. मात्र, यातील एक रुपयाचीही मदत अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना बांधावर जाऊन दिलेल्या वचनाचं काय? असा सवाल देवेद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केलाय. तसंच भाजपनं मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेला वचन दिलं होतं. हे शिवसेनेकडून सातत्यानं सांगितलं जातं. ते वचन मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आहे. पण शेतकऱ्यांना दिलेलं वचन ते विसरले, अशी टीकाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. (Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray on Farmer help)

मराठवाड्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे. सोयाबीन, कापूस, ऊस यासह अनेक पिकं वाहून गेली आहेत. झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून 10 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. मात्र ही मदत अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्यानं त्यात वाढ करण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असतानाही अतिवृष्टीचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला होता. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात 25 हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली होती. आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात मात्र अत्यंत तोकडी मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलेल्या वचनाचं काय झालं? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.

कोरोना काळातील भ्रष्टाचार उघडा पाडणार- फडणवीस

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकार पूर्ण अपयशी ठरल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. इतकंच नाही तर कोरोना संकटाच्या काळात करण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला आहे. हा भ्रष्टाचार उघडा पाडण्याचा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.

धमकावणारा मुख्यमंत्री कधी पाहिला नाही- फडणवीस

“महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र अचिव्हमेंट काय आहे? मुख्यमंत्र्यांनी सामनाला मुलाखत दिली, पण त्यामध्ये वर्षपूर्तीचा आढावा हवा होता, प्रश्न कसे सोडवणार, याबद्दलचं व्हिजन आवश्यक होतं, मात्र ते दिसलंच नाही. मुलाखतीत फक्त धमक्या दिसल्या. मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकून होतो पण दसरा मेळाव्याचं भाषण असो की कालची मुलाखत यातून ते संयमी नसल्याचं दिसून आलं”, अशी टीका फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली.

महाविकास आघाडी सरकारला आज 1 वर्ष पूर्ण झालं. या एक वर्षातील कारभाराबाबत विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून पत्रकार परिषदांचं आयोजन करण्यात आलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारच्या कारभारावर जोरदार टीका करताना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजपचे अजून काही नेते अशाच प्रकारची पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारच्या कारभाराची पोलखोल करणार आहेत.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्र्यांची मुलाखत एक दिवस आधी आली हे बरं झालं, नाहीतर तो न्यायालयाचा अवमान ठरला असता : फडणवीस

धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, देवेंद्र फडणवीसांचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्ला

आम्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं.

Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray on Farmer help