भाजप नेते वसंत गितेंची समर्थकांना ‘मिसळ’ पार्टी, पक्षांतराचा ‘कट’ शिजण्याची चिन्हं

अनिश बेंद्रे

|

Updated on: Jan 01, 2021 | 8:43 AM

वसंत गिते यांनी नववर्षाच्या मुहूर्तावर समर्थकांसाठी मिसळ पार्टीचं आयोजन केलं आहे.

भाजप नेते वसंत गितेंची समर्थकांना 'मिसळ' पार्टी, पक्षांतराचा 'कट' शिजण्याची चिन्हं
भाजप नेते वसंत गिते
Follow us

नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकांच्या (Nashik Municipal Corporation Election) तोंडावर जिल्ह्यात राजकीय बदलाचे वारे वाहू लागले आहेत. आधी बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांनी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपात घरवापसी केली. त्यानंतर भाजपमधील एक गट नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच आता भाजप नेते आणि माजी आमदार वसंत गिते (Vasant Gite) यांनी समर्थकांसाठी ‘मिसळ पार्टी’चं आयोजन केलं आहे. त्यामुळे गिते ‘मिसळी’च्या निमित्ताने पक्षांतराचा ‘कट’ शिजवणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. (Nashik Former MLA Vasant Gite may leave BJP ahead of Misal Party)

वसंत गितेंची मिसळ डिप्लोमसी

भाजपच्या प्रदेश सरचिटणीस पदावरुन उचलबांगडी करत कार्यकारिणी सदस्यपद दिल्याने वसंत गिते नाराज असल्याची चर्चा आहे. वसंत गिते यांनी नववर्षाच्या मुहूर्तावर समर्थकांसाठी मिसळ पार्टीचं आयोजन केलं आहे. ‘मिसळ डिप्लोमसी’च्या निमित्ताने ते दुसऱ्या पक्षात जाण्याची चाचपणी करत असल्याचं बोललं जातं. कार्यकर्ते, समर्थक यांच्याशी चर्चा करुन वसंत गिते पुढची दिशा ठरवणार असल्याची माहिती आहे.

मनसे जिल्हाध्यक्षांचं कार्यकर्त्यांना फर्मान

दरम्यान, भाजपवासी वसंत गितेंच्या मिसळ पार्टीला हजेरी लावू नये, असे आदेश मनसे जिल्हाध्यक्षांनी काढले आहेत. पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना गितेंच्या पार्टीला न जाण्यास मनसेने फर्मावलं आहे. वसंत गितेंसमोर सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पर्याय खुले आहेतच. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत घरवापसी करण्याबाबतही ते विचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वसंत गिते पक्षांतराचा मुहूर्त साधण्याची चिन्हं आहेत. (Nashik Former MLA Vasant Gite may leave BJP ahead of Misal Party)

नाशिक महापालिकेच्या निवडणुकीला सव्वा वर्ष असले, तरी राजकीय वातावरण आतापासूनच तापायला लागलं आहे. नाशिक महापालिकेत सत्ता आणि तीन आमदार अशी भाजपची मोठी ताकद आहे. परंतु महाविकास आघाडीने एकत्रित शड्डू ठोकल्याने भाजपच्या गोटातही अस्वस्थता पसरली आहे.

कोण आहेत वसंत गिते?

वसंत गिते यांनी नाशिकमधून मनसेच्या तिकीटावर आमदारकी भूषवली आहे. मात्र काही वर्षांपूर्वी मनसेची साथ सोडत त्यांनी भाजपचा झेंडा हाती धरला. विधानसभा निवडणुकीवेळी वसंत गिते यांना काँग्रेसने ऑफर दिल्याचं बोललं जातं. परंतु, त्यांनी ती धुडकावली होती. आता त्यांच्यासमोर शिवसेना-राष्ट्रवादीचे पर्याय असले, तरी नाशकात मनसेला बळ देण्यासाठी गिते घरवापसीचा विचार करु शकतात. मात्र नाशिक मनसे जिल्हाध्यक्षांनी समर्थकांना अटकाव करत दारं बंद असल्याचेच संकेत एकप्रकारे दिले आहेत.

संबंधित बातम्या :

बाळासाहेब सानप पुन्हा भाजपात, काय आहे राजकीय जुगाड?

नाशिक पालिका निवडणुकांसाठी शिवसेनेची रणनीती, राऊतांचा विश्वासू नेता महानगरप्रमुख

(Nashik Former MLA Vasant Gite may leave BJP ahead of Misal Party)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI