अजित पवारांचा गणेश नाईकांना धक्का, 6 नगरसेवक राष्ट्रवादीच्या, तर 4 शिवसेनेच्या वाटेवर?

भाजपचे 6 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. हा गणेश नाईक गटाला मोठा झटका मानला जात आहे.

अजित पवारांचा गणेश नाईकांना धक्का, 6 नगरसेवक राष्ट्रवादीच्या, तर 4 शिवसेनेच्या वाटेवर?

नवी मुंबई: येत्या एप्रिलमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील गणेश नाईक यांचं अस्तित्व खिळखिळं करण्यासाठी महाविकासआघाडीच्या माध्यमातून नुकताच कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा मेळावा घेण्यात आला. त्यानंतर आता थेट नाईक गटातील नगरसेवकांनाच सुरुंग लावण्यात आल्याचं दिसत आहे (Navi Mumbai BJP Corporators). आधी भाजपचे 4 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. आता पुन्हा भाजपचे 6 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. हा गणेश नाईक गटाला मोठा झटका मानला जात आहे.

काही काळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन गणेश नाईक यांच्यासोबत भाजपवासी झालेले नगरसेवक पुन्हा घरवापसीच्या तयारीत आहेत. याचं अनुषंगाने या 6 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची आहे. ऐन नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या राजकीय खेळीतून गणेश नाईकांना चांगलाच शह दिल्याचंही यानिमित्ताने बोललं जात आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. नवी मुंबईच्या तुर्भे भागातील भाजपचे 4 नगरसेवक काही दिवसांपूर्वीच शिवसनेच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली होती. यात सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, संगिता वास्कर, मुद्रिका गवळी या चार भाजपच्या नगरसेवकांचा समावेश होता. या सर्वांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. विशेष म्हणजे सुरेश कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या भव्य हळदीकुंकू समारंभासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उपस्थिती लावली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सुरेश कुलकर्णी यांचं कौतुक करत तुर्भेमधील झोपडपट्टीला एसआरए लागू करण्याबाबत पावले उचलली जातील, असंही आश्वासन दिलं होतं.

आधीच 4 नगरसेवक शिवसेनेत जात असल्याचा धक्का पचलेला नसताना आता पुन्हा 6 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याने नाईक गटाला मोठा धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेली फूट गणेश नाईकांच्या काळजीत भर टाकणारी आहे. यात संदिप सुतार, सलोजा सुतार, शुभांगी पाटील, शशिकला पाटील, चंद्रकांत पाटील आणि राजू शिंदे या नगरसेवकांचा समावेश आहे. या सर्वांनी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

गणेश नाईक यांच्याबरोबर भाजपवासी झालेल्या नगरसेवकांच्या घरवापसीचा मोठा फटका गणेश नाईक गटाला आगामी निवडणुकीत बसणार आहे. असं असलं तरी सागर नाईक यांनी कोणाच्या येण्याने जाण्याने आम्हाला काहीही फरक पडणार नसल्याचा दावा केला आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांची ही फूट नाईक गटासाठी अडचणीची असल्याचं बोललं जात आहे. आता याचा निवडणुकीवर काय परिणाम होणार याबाबत सर्वच स्तरात उत्सुकता आहे.

संबंधित व्हिडीओ :

नवी मुंबईतील पाच भाजप नगरसेवक अजित पवारांच्या भेटीला

Navi Mumbai BJP Corporators

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI