मनसेच्या उमेदवारासाठी कामगार सरसावले, 1000 कामगारांनी मिळून अनामत रक्कम भरली

गजानन काळे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मनपाच्या 1000 कामगारांनी पैसे जमा करत त्यांना अनामत रक्कम दिली आहे.

मनसेच्या उमेदवारासाठी कामगार सरसावले, 1000 कामगारांनी मिळून अनामत रक्कम भरली

नवी मुंबई: निवडणुका म्हटल्या की कोट्यावधींची संपत्ती आणि कोट्यावधींचा खर्च (Election Expense) हे समीकरण ठरलेलंच. मात्र, अशा वातावरणातही काही उमेदवारांच्या जेमतेम आर्थिक परिस्थितीत नागरिकच त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसतात. मनसेचे बेलापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार (MNS Belapur Assembly Candidate) गजानन काळे (Gajanan Kale) यांच्याबाबतही असाच प्रकार पाहायला मिळाला. गजानन काळे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मनपा कामगार वर्गात आनंदाचं वातावरण दिसून आलं. मनपाच्या एकूण 1000 कामगारांनी स्वतः पैसे जमा करत गजानन काळे यांची अनामत रक्कम भरली.

यावेळी मनपा कामगारांनी गजानन काळे यांचं भरभरून कौतुकही केलं. कामगारांसाठी लढणारा, आमचे थकीत पगार मिळवून देणारा, आमच्या प्रलंबित मागण्यांसाठी एका हाकेवर धावून येणारा, आमच्या सुरक्षेची काळजी घेणारा उमेदवार गजानन काळे आमदार व्हावा अशीही सदिच्छा यावेळी उपस्थित कामगारांनी व्यक्त केली. या कामगारांनी गजानन काळे यांच्या विजयासाठी त्यांना घराघरात घेऊन जाऊ, अशीही भावना व्यक्त केली. नवी मुंबई मनपा कामगारांच्या या प्रतिसादाने मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलेच उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.

यावर बोलताना मनसेचे बेलापूर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार गजानन काळे म्हणाले, “मनपा कामागारांनी अशा पद्धतीने माझ्यावर विश्वास दाखवल्याने मी गहिवरलो आहे. कामगारांनी त्यांच्या कष्टाच्या पैशातून विधानसभा निवडणुकीसाठी मला अनामत रक्कम दिली आहे. त्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. मी कामगारांचा हा विश्वास माझ्यावरचा आशिर्वाद समजतो आणि त्यामुळेच माझा आत्मविश्वास वाढला आहे.”

गजानन काळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः अमित ठाकरे यांच्यासह हजारो लोक उपस्थित होते. काळे यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात बेलापूर मतदारसंघात 151 झाडे लावून केली. इतर मनसे पदाधिकाऱ्यांनी देखील नवी मुंबई परिसरात झाडे लावत या प्रचारात सहभाग घेतला.

कोण आहे गजानन काळे?

छात्रभारती या विद्यार्थी संघटनेतून कामाला सुरुवात केली. छात्रभारतीच्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थी प्रश्नांवर लढा दिला आणि प्रश्न मार्गी लावले. अनेकदा प्रस्थापित शिक्षक सम्राटांनाही आव्हान दिलं. विद्यार्थी नेता म्हणून विद्यापीठ आणि मंत्रालयात त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या प्रयत्नातून अनेक विद्यार्थ्यांना न्याय मिळाला.

काळे यांचं हेच काम पाहून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गजानन काळेंना मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या, महाराष्ट्र सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली. याठिकाणी देखील काळे यांनी चांगलं काम केल्यानं गजानन काळेंची मनसेच्या नवी मुंबई शहर अध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली. आता त्यांना बेलापूर (151) मतदारसंघातून मनसेने उमेदवारी दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *