“हा तर संस्कृतीवरचा घाला, एका मांडवात दोन तरूणींशी लग्न करणाऱ्यावर कारवाई व्हावी”, नवनीत राणा यांची संसदेत मागणी
अकलूजच्या त्रिकोणी लग्नाची संसदेत चर्चा...

नवी दिल्ली : सोलापूरच्या अकलूजमध्ये एका तरूणाने दोन जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केलं. या लग्नाची सर्वत्र चर्चा झाली. आता तर या लग्नाची (Rinki Padgoankar Pinki Padgoankar and Atul Awtade) थेट संसदेत झाली. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला. कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
नवनीत राणा काय म्हणाल्या?
सोलापुरच्या अकलूजमध्ये एक घटना घडली त्यामुळे हिंदू संस्कृतीवर डाग लागला. एका व्यक्तीने एकाच मांडवात दोन तरूणींशी लग्न केलं. कलम 494, 495 हे कायदे देशात आहेत. पण देशात अद्यात एका वेळी दोघी मुलींशी लग्न करण्याबाबत कोणताही ठोस कायदा बनवण्यात आलेला नाही. यासाठी काहीतरी नवा कायदा बनवणं गरजेचं आहे. जे असं लग्न करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. जेणे करून अशा घटना भविष्यात घडणार नाहीत, असं नवनीत राणा संसदेत म्हणाल्या आहेत.
अकलूजमधल्या एका लग्नाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. एक तरूणाने चक्क दोन मुलींशी एकाच मांडवात लग्नगाठ बांधलीये. अतुल अवताडे या तरूणाने रिंकी आणि पिंकी पाडगावकर या दोन जुळ्या बहिणींसोबत सप्तपदी घेतली. त्यांच्या या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय. त्यांच्या विवाहाचे फोटो आणि व्हीडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यांच्या लग्नावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
एकाच मांडवात जुळ्या बहिणींशी केलेला विवाह नवरदेव अतुल अवताडे अंगलट आलाय. अतुलच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 च्या 494 कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात NCR ही दाखल झाला आहे.
