आशिष शेलार म्हणाले, पवारांचं तोंड शिवलं होतं का, आता राष्ट्रवादीचं पुराव्यासह उत्तर

आशिष शेलारांच्या टीकेला राष्ट्रवादीने पुराव्यासकट उत्तर दिलं आहे. | NCp Reply Ashish Shelar

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:11 PM, 27 Jan 2021
आशिष शेलार म्हणाले, पवारांचं तोंड शिवलं होतं का, आता राष्ट्रवादीचं पुराव्यासह उत्तर
Sharad pawar And Ashish Shelar

मुंबई :  दिल्ली हिंसाचारावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांना सवाल करताना खास करुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला. दिल्लीत काल झालेल्या हिंसेवर भूमिका का घेतली नाही, असं विचारताना पवार आणि राऊतांचं तोंड शिवलं होतं का?, असा सवाल शेलारांनी केला. आता शेलारांच्या टीकेला राष्ट्रवादीने पुराव्यासकट उत्तर दिलं आहे. (NCP Clyde Crasto And Amol Mitkari Reply BJP Ashish Shelar Press Conference)

राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी ट्विट करुन शेलारांच्या पत्रकार परिषदेला जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. “जेव्हा शरद पवार काल फेसबुकवर लाईव्ह बोलत होते तेव्हा तुम्ही काय झोपले होते का?”, असा प्रतिसवाल क्रास्टो यांनी शेलारांना विचारलं आहे.

गुड मॉर्निंग आशिष शेलार, झोपेतून उठा आणि ही लिंक चेक करा, असं म्हणत क्रास्टो यांनी पवारांनी मंगळवारी साधलेल्या संवादाची लिंक ट्विट करुन शेलारांना जशास तसं प्रत्तुत्तर दिलं आहे.

जितेंद्र आव्हाडांचं आशिष शेलारांना उत्तर

आंदोलन हाताळण्यात सरकार अपयशी ठरंल आहे. त्यामुळे भाजप नेते इतरांवर खापर फोडत आहेत. 60 दिवस थंडीत शेतकरी आंदोलन करत होते. तीन कायदे एका दिवसात पारित केले ते तुमचे पहिल्यांदा पाप आहे, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलं. आम्ही हिंसेच समर्थन करत नाही. फक्त तुम्ही चुकलो याची कबुली द्या, असं आव्हाड म्हणाले. तर टीव्हीवर येण्यासाठी पवारांचं नाव घेतलं जातं असल्याचा टोला आव्हाडांनी शेलारांना लगावला.

मिटकरींचंही शेलारांना उत्तर

अमोल मिटकरी यांनी ट्विट करून आशिष शेलार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आशिष शेलार हे भाजप व संघाचे गुलाम असून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याचे मूकपणे समर्थन करीत आहेत. दिल्लीच्या हिंसाचारा मागे भाजपचा कार्यकर्ता दीप सिद्धू असल्याचा आरोप शेतकरी का करत आहेत? याचे उत्तर शेलार यांनी दिले नाही, अशी टीका मिटकरी यांनी केली आहे.

मिटकरी यांनी दोन ट्विट करून शेलार यांना घेरलं आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये तर त्यांनी थेट दीप सिद्धूवरून शेलारांना सवाल केला आहे. आशिष शेलार साहेब, खरं सांगा दीप सिद्धू तुमचे कोण?, असा परखड सवाल त्यांनी शेलार यांना केला आहे.

पत्रकार परिषद घेऊन शेलारांची पवार-राऊतांवर जोरदार टीका?

आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती. शेलार यांनी खासकरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. “कधी काळी आवश्यक वाटल्यास फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवार… कालच्या घटनेवर तुम्ही फेसबुक पोस्ट का टाकली नाही… पवारसाहेब तुमची फेसबुक पोस्ट जवान आणि पोलिसांच्या बाजूने का आली नाही… आंदोलनात जो वावर आणि वाद पहिल्यापासून चालू आहे त्याचे समर्थन शरद पवार, संजय राऊत यांनी केलं. मग काल हे सगळं घडल्यावर शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आता का शिवली?, असा घणाघाती हल्ला शेलार यांनी केला.

शेलारांचा संजय राऊतांना सवाल

“रोज वचवच करणारे संजय राऊत कालच्या घटनेवर काही बोलले नाहीत. संजय राऊतांना माझा सवाल आहे की, रोज कोणत्याही विषयावर बोलायला जमतं मग काल देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत?”, असा सवालही त्यांनी केला.

(NCP Clyde Crasto And Amol Mitkari Reply BJP Ashish Shelar Press Conference)

हे ही वाचा :

आशिष शेलार साहेब, खरं सांगा दीप सिद्धू तुमचे कोण?; मिटकरींचा सवाल

शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आज का शिवली आहेत?, आशिष शेलारांचा हल्लाबोल