जयंत पाटील यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे संकेत, वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात थेट म्हणाले, ‘आता पवार साहेबांनी…’
पवार साहेबांनी मला बरीच संधी दिली. सात वर्षांचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुमच्या सर्वांसमोर मी विनंती करतो की, पवार साहेबांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम मंगळवारी पुण्यात होत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा थेट राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. रोहित पवार यांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटील यांनी शरद पवार यांना विनंती करत नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे वक्तव्य केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लवकरच नवीन प्रदेशाध्यक्ष मिळू शकतो, असे म्हटले जात आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
पुण्यात बोलताना रोहित पवार यांनी आपल्याकडे पक्षाचे कोणतेही पद नाही, अशी खंत व्यक्त केली. पक्षात काही खांदेपालट होणार का? असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, मी फक्त आमदार आहे. साधा कार्यकर्ता आहे. माझ्याकडे कोणतेही पद नाही. हे सर्व निर्णय पदाधिकारी घेतील. परंतु पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व काम करत आहोत. ते सांगतील ती दिशा घेऊनच आम्हाला काम करावे लागणार आहे, असे रोहित पवार म्हणाले.
जयंत पाटील यांनी दिले संकेत
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी पद सोडण्याचे संकेत दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले, मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षांचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुमच्या सर्वांसमोर मी विनंती करतो की, पवार साहेबांनी योग्य तो निर्णय घ्यावा. आम्ही तुकाराम महाराज यांच्या विचारांचे आहोत. तुकाराम महाराज यांनी सांगितले की, भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी, यामुळे या पुढे रस्त्यावर उतरण्याची भूमिका आहे. ही लढाई तुकाराम vs नथुराम आहे. पुढे रस्त्यावर उतरणार आहोत. पराभवाची चर्चा करू नका, असे जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटील म्हणाले, सुप्रियाताईंनी आॕपरेशन सिंदूर बद्दल भुमिका मांडली. आपले पक्षीय मतभेद असतील मात्र परराष्ट्र धोरणाचा प्रश्न येतो तेव्हा या देशाच्या संरक्षणाची भूमिका पुढे मांडावी लागते. त्या ठिकाणी आपल्या पक्षाने आणि आदरणीय पवार साहेबांनी आम्हा सगळ्यांना सांगितलेले आहे की देश हिताची भूमिका ही सर्वप्रथम घेतली पाहिजे. शत्रूला धडा शिकवण्याची वेळ येते, त्यावेळी देश एकसंघ असला पाहिजे.
