जितेंद्र आव्हाडांकडून बाळासाहेबांचा जुना व्हिडीओ शेअर

"काळाची गरज......" असे लिहित जितेंद्र आव्हाड यांनी बाळासाहेबांच्या भाषणातील एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

जितेंद्र आव्हाडांकडून बाळासाहेबांचा जुना व्हिडीओ शेअर
अनिश बेंद्रे

|

Sep 13, 2020 | 11:08 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे.  “काळाची गरज……” असे लिहित जितेंद्र आव्हाड यांनी बाळासाहेबांच्या भाषणातील एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.  (NCP Minister Jitendra Awhad indirectly supports Navy Veteran attack by Shivsainik)

बाळासाहेब ठाकरे यांच्या व्हिडीओमध्ये काय?

“साहजिक आहे… कारण नसताना तुमच्या कोणी कानफटात मारल्यानंतर तुम्ही म्हणाल, वा छान, मस्त बसली, आणखी जोरात मारायला पाहिजे होती… इतका बुळचटपणा बरा नव्हे. त्याचा फटकन आवाज आल्यानंतर आपला काडकन आवाज आला पाहिजे. तो शिवसैनिक… नुसत्या टाळ्या मारण्यासाठी हात नकोत, कानफटात मारण्यासाठी तयार ठेवा”

शिवसेनेची भूमिका काय?

“महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्याची गय केली जाणार नाही. हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. मुंबईत काल एका माजी नौदल अधिकाऱ्यावर हल्ला झाला. त्या अधिकाऱ्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत प्रसारित केलेले व्यंगचित्र बदनामीकारक असले तरी त्यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची संतप्त, तितकीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. तरीही हल्लेखोरांना तत्काळ अटक करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.

विरोधी पक्षाने या घटनेचे राजकीय भांडवल करावे हे दुर्दैव आहे. संयम दोन्ही बाजूने पाळला गेला पाहिजे. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री या घटनात्मक पदांबाबत टोकाची टीका करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार झाला तर लोकांच्या संयमाचा बांध फुटतो. म्हणून सगळ्यांनीच जबाबदारीने, एकमेकांचा आदर ठेवून वागण्याची ही वेळ आहे. समाजात अशांतता व तणाव निर्माण होऊ न देणे हे सत्ताधाऱ्यांइतकेच विरोधकांचेही कर्तव्य आहे”, अशी भूमिका शिवसेनेने संजय राऊत यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात मांडली आहे. (NCP Minister Jitendra Awhad indirectly supports Navy Veteran attack by Shivsainik)

शिवसेनेच्या भूमिकेवर प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया 

“सत्तेचा माज आणि मस्ती काय असते हे पुन्हा एकदा संजय राऊत यांनी दाखवून दिले आहे. तसेच त्यांनी निवृत्त नौदल अधिकारी शर्मा यांना मारहाण झाल्याचे समर्थन केल्याचेही दाखवून दिले. मला आश्चर्य वाटते. एका बाजूला बोलतात कायदा हातात घेणाऱ्याची गय नाही आणि त्याच वेळेला शिवसेना शाखाप्रमुखांनी कायदा हातात घेतला. त्यांच्यावर या महाविकास आघाडी सरकारवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. या प्रकरणावर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या असतानाही शिवसैनिकांनी केलेली मारहाण किती योग्य हे याठिकाणी संजय राऊत यांनी दाखवून दिलं. हे कायद्यासाठी आणि लोकशाहीच्या राज्यासाठी धोकादायक आहे” अशी प्रतिक्रिया विधानपरिपषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर दिली.

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह व्यगंचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केल्यामुळे मुंबईत शिवसैनिकांनी 65 वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवार 11 सप्टेंबरला समोर आला होता. या प्रकरणी अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांना जामीन मिळाला आहे. आरोपींमध्ये शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम यांचाही समावेश आहे.

कांदिवलीतील समतानगरमध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात राहणारे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप झाला होता. मारहाणीत मदन शर्मा यांच्या चेहऱ्याला तसेच डोळ्याला गंभीर इजा झाली. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.

मदन काशिनाथ शर्मा यांनी त्यांच्याकडील ‘महानगर -1’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राजकीय पुढार्‍यांचे आक्षेपार्ह व्यगंचित्र फॉरवर्ड केले. या कारणावरुन कमलेश कदम आणि इतर आठ ते दहा जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादीला मारहाण करत डोळ्याला दुखापत केली म्हणून समतानगर पोलीस ठाणे येथे कलम 325, 143, 147, 149 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. शनिवारी सकाळी कोर्टात हजर केले असता सहाही आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला.

संबंधित बातम्या :

नि. नौदल अधिकारी मारहाण : शिवसेनेविरोधात भाजपचं आंदोलन, नांगरे पाटील घटनास्थळी, गृहमंत्र्यांचा दरेकरांना फोन

बदनामीकारक व्यंगचित्रामुळे हल्ला, सेनेकडून अप्रत्यक्ष समर्थन, भाजपची सडकून टीका

कांदिवलीत निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण प्रकरण, अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांना जामीन

(NCP Minister Jitendra Awhad indirectly supports Navy Veteran attack by Shivsainik)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें