विनायक मेटेंनी कोणतीही भूमिका घेऊ द्या, काहीही फरक पडत नाही : प्रीतम मुंडे

मेटे आता नव्याने त्यांची भूमिका मांडणार आहेत. पण मेटेंच्या भूमिकेचा आम्हाला काहीही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी दिली.

विनायक मेटेंनी कोणतीही भूमिका घेऊ द्या, काहीही फरक पडत नाही : प्रीतम मुंडे

बीड : संपूर्ण महाराष्ट्रात भाजपचे घटक पक्ष महायुतीबरोबर आहेत. मात्र बीडमध्ये विधानसभा निवडणुकीत विनायक मेटे (Vinayak Mete Beed Vidhansabha) यांचा शिवसंग्राम पक्ष अलिप्त असल्याचं दिसून येतं. लोकसभा निवडणुकीतही मेटेंनी (Vinayak Mete Beed Vidhansabha) फक्त बीडमध्ये पाठिंबा दिला नव्हता. अशातच मेटे आता नव्याने त्यांची भूमिका मांडणार आहेत. पण मेटेंच्या भूमिकेचा आम्हाला काहीही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. प्रीतम मुंडे (MP pritam munde) यांनी दिली.

भाजपचा मित्रपक्ष शिवसंग्रामला राज्यात तीन जागा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटेंची मनधरणी केली. मात्र बीड विधानसभा मतदारसंघात मेटेंनी अद्याप भूमिका स्पष्ट केली नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी मेटेंनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्यासाठी दबाव आणला. मात्र यावेळी मेटेंनी मुख्यमंत्र्यांचा शब्द पाळला असावा.

बीडमध्ये स्थानिक पातळीवर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातील राजकीय वैर आजही कायम आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसंग्रामने राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दिल्याने या दोघातील संघर्ष अधिकच वाढला. सध्या जिल्ह्यात निवडणुकीचं वातावरण तापलं असताना शिवसंग्राम यापासून अलिप्त आहे. मेटेंच्या भूमिकेमुळे लोकसभेत कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे विधानसभेतही त्यांच्या भूमिकेचा फरक पडणार नसल्याचं प्रीतम मुंडे म्हणाल्या.

बीड विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंनी जयदत्त क्षीरसागरांना बळ दिल्याने, विनायक मेटे नाराज आहेत. शुक्रवारी कार्यकर्त्यांच्या बोलावलेल्या बैठकीत मेटे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळेच बैठकीत मेटे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI