सत्तेसाठी किती लाचारी करायची हे शिवसेनेने ठरवावं, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

मंत्री नसलेल्या सरकारचा चहाच नको, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी चहापानावर बहिष्कार टाकण्याचा विरोधी पक्षाचा निर्णय जाहीर केला.

सत्तेसाठी किती लाचारी करायची हे शिवसेनेने ठरवावं, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

नागपूर : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेची भूमिका काय आहे? असा प्रश्न विचारत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘सत्तेसाठी किती काळ लाचारी स्वीकारायची हे शिवसेनेने ठरवावं’ असा टोला हाणला. सावरकरांना संपूण देश मानतो, राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही फडणवीसांनी केली. नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षाच्या पत्रकार परिषदेत (Devendra Fadnavis before Winter Session) ते बोलत होते. यावेळी मंत्री नसलेल्या सरकारचा चहाच नको, असं म्हणत फडणवीसांनी चहापानावर बहिष्कार टाकण्याचा विरोधी पक्षाचा निर्णय जाहीर केला.

‘सरकारचा शपथविधी होऊन अनेक दिवस लोटले तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. तिन्ही पक्षातील विसंवादामुळे खातेवाटप झालेलं नाही. खातेवाटप न झाल्याने उत्तर कोण देणार माहित नाही. नागपूर अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार न करण्यातून सरकार गंभीर नसल्याचं दिसतं. सरकार हे अधिवेशन कागदोपत्री पार पडणार’ अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.

स्वतःची मागणीच उद्धव ठाकरेंकडून अपूर्ण

ओला दुष्काळग्रस्तांना अद्याप पुरेशी मदत मिळाली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हेक्टरी 25 हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली होती. स्वत: मागणी केलेली पूर्तताही ठाकरे सरकारनं केली नाही. आतापर्यंतच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेती नुकसानीची चर्चाही झाली नाही, अशी टीका फडणवीसांनी केली. आता उद्धव ठाकरे यांनी हेक्टरी 25 हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

महाविकास आघाडी टिकवण्यासाठी काय करावं? अजित पवारांचा सल्ला

या सरकारने 23 हजार कोटी रुपये तात्काळ ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्यावे, असं सांगतानाच, तुम्ही शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळा, अशी आठवण या सरकारला आम्ही करुन देणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा, शेतकरी कर्जमाफीचा कार्यक्रम या सरकारने या हिवाळी अधिवेशनात जाहीर करावा, अशी मागणी विरोधीपक्षाने केली.

स्थगिती सरकारचा पुनरुच्चार

हे सरकार स्थगिती सरकार आहे. कामांना स्थगिती दिल्यामुळे ग्रामीण भागात मोठा असंतोष आहे. विकास कामांना स्थगिती दिल्यामुळे गुंतवणुकीवर परिणाम होत आहे. त्यामुळे स्थगिती दिलेली कामं तात्काळ सुरु करावी, अशी मागणीही फडणवीसांनी (Devendra Fadnavis before Winter Session) केली.

आर्थिक स्थितीबाबत चुकीची माहिती

भविष्यात हात वर करता यावे म्हणून सरकार राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चुकीची माहिती पसरवत आहे. राज्याची आर्थिक स्थिती इतर राज्यांपेक्षा चांगली आहे. महाराष्ट्र अजूनही 27 लाख कोटींपर्यंत कर्ज घेऊ शकतो, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

शिवसेनेचीही जबाबदारी

शिवसेना आमच्यासोबत सरकारमध्ये होती, तेव्हा घेतलेले सर्व निर्णय शिवसेनेच्या संमतीने घेतले. आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते सेनेकडून ते निर्णय चुकीचे होते असं वदवून घेतात. आधीच्या कॅबिनेटचा एखादा निर्णय चुकला असेल, तरीही त्याची जबाबदारी भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेचीही आहे, असं फडणवीस म्हणाले.

सावरकरांबद्दल जाज्वल्य राष्ट्रभक्ती कुठे गेली?

सत्तेसाठी किती काळ लाचारी स्वीकारायची, हे सेनेनं ठरवावं. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावर सेनेची भूमिका काय आहे? गांधी आडनाव लावून कोणी गांधी होत नाही. कालपर्यंत शिवसेनेला सावरकरांबद्दल जाज्वल्य राष्ट्रभक्ती होती, आता सत्तेची लाचारी आहे. राहुल गांधी यांना माफी मागावी लागेल. सत्तेची लाचारी किती करावी? हे सेनेनं ठरवायचं आहे, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम

जीडीपीच्या 26 टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकतो. सध्या राज्याने जीडीपीच्या 15 टक्के कर्ज घेतलंय. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्ज घ्यावं. अजूनही राज्य सरकार जीडीपीच्या 8-9 टक्के कर्ज घेऊ शकतो. अडचण असल्यास सरकारने आमच्याशी चर्चा करावी, आम्ही सरकारला कर्ज कसं घ्यायचं ते सांगू. आम्ही कधीही केंद्र सरकारच्या मदतीसाठी थांबलो नाही. ठाकरे सरकार टाळाटाळ करत आहे, असा आरोपही फडणवीसांनी (Devendra Fadnavis before Winter Session) केला.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI