‘होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत’, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यावर आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय.

'होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत', फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार
देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘विरोधक गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन केला तर आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा देत आहेत. मी म्हणतो त्यांनी आता रस्त्यावर जरुर उतरावं. पण कोरोना विरुद्ध लढाई लढण्यासाठी’, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय.(Devendra Fadnavis criticizes CM Uddhav Thackeray over lockdown)

“होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत…आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची”, असं ट्वीट करत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टोला हाणलाय. कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात मुख्यमंत्री ‘मातोश्री’ किंवा ‘वर्षा’ बंगल्यावरुनच अधिकाऱ्यांना सूचना आणि आदेश देत होते. त्यावेळीही विरोधक मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका करत होते. आता पुन्हा एकदा फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय.

फडणवीसांची पूर्ण पोस्ट

फ्रान्सने तिसर्‍यांदा लॉकडाऊन लावला…
पण, 120 अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले…

हंगेरीत ‘वर्क फ्रॉम होम’…
पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला…

डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती…
पण, एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज…

ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत…
पण, 2,20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्‍यांना मदत
एवढेच नाही तर वेतन न मिळणार्‍यांना 800 युरोंपर्यंत मदत !

बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय…
पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय…

पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे…
पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले…

आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत…
पण, 7.4 बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलंय…

फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत…
पण, 3.4 बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलंय…

युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही दिलंय…
तुलना केवळ परिस्थितीशी नको,सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा!
विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही,तर आपण प्रत्यक्ष काय करतो,याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल.

होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत…
आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची…

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

राज्यात लॉकडाऊन लावला तर आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा विरोधकांकडून दिला जात आहे. मी म्हणतो आता रस्त्यावर उतराच. आता सगळ्यांनीच रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. पण रस्त्यावर उतरायचं ते आंदोलन, मोर्चांसाठी नाही. तर लोकांच्या सेवेसाठी. ज्या घरात सर्वच कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांच्या मदतीसाठी, जे आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटसाठी जे जिवाची पर्वा न करता आपलं कर्तव्य बजावत आहेत, अशा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना केलंय.

ज्या उद्योगपतींनी सल्ला दिलाय, त्यांना सांगतोय

तर आनंद महिंद्रांच्याही पत्राचा हवाला देत त्यांनी त्यांनाही खडे बोल सुनावलेत. एका उद्योगपतीनं सांगितलंय की, लॉकडाऊन लावण्याऐवजी आरोग्य सुविधा वाढवा. गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा वाढवली. सगळ्या उद्योगपतींबद्दल बोलत नाही, ज्यांनी सल्ला दिलाय, त्यांना सांगतोय. आरोग्य व्यवस्था वाढवा, वाढवतोय.

संबंधित बातम्या :

CM Uddhav Thackeray PC : लस म्हणजे धुवाँधार पावसातील छत्री, मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे मुद्दे

Maharashtra Corona Update : चिंता वाढली, राज्यात दिवसभरात 47 हजार 827 रुग्णांची भर, तर मृतांचा आकडा 200 पार!

Devendra Fadnavis criticizes CM Uddhav Thackeray over lockdown

Published On - 10:47 pm, Fri, 2 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI