सांगलीची पुनरावृत्ती टळली, पिंपरी चिंचवडच्या तिजोरीच्या चाव्या भाजपकडे, राष्ट्रवादीचा पराभव

पिंपरी चिंचवड स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे नितीन लांडगे विराजमान झाले आहेत (Pimpri Chinchwad Standing Committee Election)

  • रणजीत जाधव, टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड
  • Published On - 14:32 PM, 5 Mar 2021
सांगलीची पुनरावृत्ती टळली, पिंपरी चिंचवडच्या तिजोरीच्या चाव्या भाजपकडे, राष्ट्रवादीचा पराभव
पिंपरी चिंचवड महापालिका

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा विजय झाला. सांगली महापौर निवडणुकीप्रमाणे ‘करेक्ट कार्यक्रमाची’ पुनरावृत्ती करण्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादीला पराभवाला सामोरं जावं लागलं. पिंपरी चिंचवड स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे नितीन लांडगे विराजमान झाले आहेत. (Pimpri Chinchwad Standing Committee Election BJP defeats NCP)

स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार प्रवीण भालेकर यांचा पराभव झाला. भाजपचे नितीन लांडगे 10 विरुद्ध 5 मतांनी विजयी झाले. भाजपचे नाराज सदस्य रवी लांडगे निवडणुकीला अनुपस्थित होते. सांगली महापौरपदाच्या निवडणुकीत केलेल्या ‘करेक्ट कार्यक्रमाची’ पुनरावृत्ती करु, असा दावा करणाऱ्या राष्ट्रवादीला पराभवाचा फटका बसला.

पुण्यात भाजपकडून व्हिप जारी

पुणे महापालिकेच्या स्थायी आणि शिक्षण समितीची निवडणूक शुक्रवारी पार पडणार आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून हेमंत रासने यांनी, तर शिक्षण समिती अध्यक्षपतासाठी भाजपकडून मंजुश्री खर्डेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. तर उपाध्यक्षपदासाठी कालिंदा पुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी बंडू गायकवाड आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी सुमन पठारे यांनी अर्ज दाखल केला आहे. तर शिक्षण समितीच्या उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या प्राची आल्हाट यांनी अर्ज दाखल केला आहे.

सोलापूर स्थायी निवडणुकीला स्थगिती

दरम्यान, सोलापूर महापालिका स्थायी समिती सभापतीच्या निवडीला आठ दिवसांची स्थगिती मिळाली आहे. नगर विकास खात्याने निवडणुकीला स्थगिती दिली आहे. भाजपने विजयाचा गुलाल उधळण्याची तयारी केली होती, परंतु महाविकास आघाडीच्या खेळीने तूर्तास तरी भाजपचे मनसुबे उधळले आहेत.

एमआयएमच्या रियाज खैरादींच्या निवडीवर शिवसेनेने आक्षेप घेतल्यामुळे ऐनवेळी निवडणूक थांबवली होती. नगर विकास खात्याच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी जल्लोष केला.

अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी विजयी

अहमदनगर महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अविनाश घुले विजयी झाले. घुलेंच्या विरोधात शिवसेनेच्या विजय पठारे यांनी अर्ज दाखल केल्यामुळे ट्विस्ट निर्माण झाला होता, परंतु नंतर पठारेंनी माघार घेतली.

नाशिकमध्ये मनसे किंगमेकर

नाशिक महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक 9 मार्चला होणार आहे. मनसेच्या मदतीने भाजप पाचव्यांदा स्थायी समिती राखणार आहे. नाशिक शहराच्या तिजोरीच्या चाव्या ताब्यात ठेवण्यासाठी सगळ्याच पक्षांचा प्रयत्न असेल. आगामी नाशिक महापालिका निवडणुकांच्या तोंडावर स्थायी निवडणूक महत्वाची मानली जाते. स्थायी समितीचे सर्वच सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. (Pimpri Chinchwad Standing Committee Election BJP defeats NCP)

भाजप आणि महाविकास आघाडी दोघांचेही प्रत्येकी 8 सदस्य असल्यामुळे रंगत वाढली आहे. नाशिक महापालिकेत स्थायी समितीच्या सर्वच 16 सदस्यांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची महापौरांकडून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तौलनिक संख्याबळाच्या आधारे नाशिकच्या महापौरांनी स्थायी समितीचे सदस्य जाहीर केले. नाशिक महापालिकेत स्थायी समितीवर भाजपचे 8, शिवसेनेचे 5, काँग्रेसचा 1, राष्ट्रवादीचा 1, तर मनसेचा 1 सदस्य असेल. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना होणार असल्यामुळे मनसे स्थायी निवडणुकीत किंगमेकर ठरणार आहे.

सांगली महापौरपदाच्या निवडणुकीत काय झालं?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत भाजपला आस्मान दाखवलं. सांगली मिरज कुपवाड महापालिकेत सत्तापरिवर्तन करण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून महापौरपदी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी (Digvijay Suryavanshi) यांची निवड झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरदार धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजप उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा 3 मतांनी पराभव केला. भाजपची पाच मतं फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आलं. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना 39 मतं मिळाली, तर भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांना मिळाली 36 मतं पडली.

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धास्तीने नाशकात भाजपची मनसेला टाळी

सांगलीतील पराभवाचा भाजपला धसका, पुण्यात खबरदारी! नगरसेवकांना व्हिप जारी

(Pimpri Chinchwad Standing Committee Election BJP defeats NCP)