…. म्हणून मोदींनी राजीव गांधी आणि INS विराटचा मुद्दा प्रचारात आणला?

.... म्हणून मोदींनी राजीव गांधी आणि INS विराटचा मुद्दा प्रचारात आणला?

नवी दिल्ली : देशाचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी आणि आयएनएस विराटचा मुद्दा मला स्वत: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. राहुल गांधी यांनी माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला. पण, मोदीची प्रतिमा खान मार्केट किंवा कुठल्या ल्युटीयन्स गँगने तयार केलेली नाही, जी कुणीही एका झटक्यात मिटवू शकेल, असं म्हणत मोदींनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी राजीव गांधी आणि आयएनएस विराटचा मुद्दा निवडणूक प्रचारात का आला यावर स्पष्टीकरण दिलं. यावेळी राहुल गांधी यांनीच आपल्याला असं करण्यास भाग पाडल्याचं मोदी यांनी सांगितलं.

दिल्लीच्या रामलीला मैदानात गेल्या 8 मे रोजी मोदींची सभा होती. तेव्हा मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. मोदींनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका करत त्यांनी भारतीय वायुसेनेतील युद्धनौका आयएनएस विराटचा टॅक्सीसारखा वापर केल्याचं म्हटलं. मोदींनी राजीव गांधी यांच्या सुट्ट्यांचा मुद्दा उचलला. “कुठला पंतप्रधान आपल्या कुटुंबासह युद्धनौकेने सुट्टीवर जातो. देशाची रक्षा करणाऱ्यांना कोण आपली जहागिरी समजतं. काँग्रेसच्या प्रसिद्ध गांधी कुटुंबाने आयएनएस विराटचा टॅक्सी सारखा वापर केला. त्याचा अपमान केला”, असा घणाघात मोदींनी या सभेत केला होता.

आयएनएस विराटचा मुद्दा आला कुठून? जेव्हा मोदींना हा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी याचं कारण राहुल गांधी असल्याचं सांगितलं. “आयएनएस विराटचा मुद्दा काही नवीन नाही. काँग्रेस अध्यक्षांनी जेव्हा एका पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, लष्कर मोदीची जहागिरी नाही. तेव्हा तुम्ही (माध्यमांनी) याकडे दुर्लक्ष केलं. म्हणून मला सांगावं लागलं की, व्यक्तिगत जहागिरी काय असते. राजीव गांधी यांचा मुद्दा माझा नाही. जर तुम्हाला त्यांची (काँग्रेस) मदत करायची असेल तर तुम्ही त्या मुद्याला महत्त्व देऊ शकता. हा तुमचा निर्णय आहे. पण, राजीव गाधींबाबत या गोष्टी त्यावेळीही माध्यमांमध्ये छापून आल्या होत्या. तेव्हा कुठलाही अॅडमिरल स्पष्टीकरण देण्यासाठी पुढे आला नव्हता”, असं मोदींनी म्हटलं.

माझी प्रतिमा खान मार्केट गँगने बनवलेली नाही

राहुल गांधी यांनी झारखंडच्या सभेत म्हटलं की, त्यांना मोदींचा प्रतिमा खराब करायची आहे. ते कुठल्याही प्रकारे माझी प्रतिमा खराब करण्याची इच्छा ठेवतात, असं माझ्या वाचण्यात आलं. मात्र, मोदींची प्रतिमा ही दिल्लीच्या खान मार्केट गँगने बनवलेली नाही, ल्युटियन्सने बनवलेली नाही. मोदींच्या 45 वर्षाच्या तपस्येने त्यांची ही प्रतिमा तयार झाली आहे. चांगली किंवा वाईट जशीही असेल, तुम्ही माझी प्रतिमा खराब करु शकत नाही. मात्र, खान मार्केट गँग आणि ल्युटीयन्स गँगने एका दिवंगत पंतप्रधानांची प्रतिमा ‘मिस्टर क्लीन, मिस्टर क्लीन’ अशी बनवली होती. ती कशाप्रकारे संपली?, हे सर्वांना माहित आहे’, असा पलटवार करत मोदींनी राहुल गांधी आणि गांधी परिवारावर टीकेची झोड उठवली.

पंतप्रधान मोदींनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी आणि आयएनएस विराटच्या मुद्यावरुन काँग्रेस आणि गांधी परिवारावर निशाणा साधला. रहुल गांधी यांच्यामुळेच हा मुद्दा उठवल्याचा आरोप अप्रत्यक्षरित्या मोदींनी केला. त्यामुळे राहुल गांधी आता यावर काय प्रत्युत्तर देणार हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

‘चौकीदार चोर है’ने 30 वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ घोषणेचा बदला?

INS सुमित्रावरुन मोदींचा अक्षय कुमारसोबत फेरफटका, काँग्रेसचा दावा

खरंच ‘INS विराट’चा राजीव गांधींनी टॅक्सीसारखा वापर केला होता?

INS विराटचा सुट्ट्यांसाठी वापर झाला, मी स्वतः साक्षीदार : नि. कमांडर व्हीके जेटली

Published On - 12:35 pm, Mon, 13 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI