प्रकाश आंबेडकर-विनायक मेटेंमध्ये गुफ्तगू, नव्या समीकरणांचे संकेत

प्रकाश आंबेडकर-विनायक मेटेंमध्ये गुफ्तगू, नव्या समीकरणांचे संकेत

बीड : भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी वंचित बहुजन आघाडी निर्माण केली आहे, तर शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे सत्तेत असूनही सत्तेच्या पदापासून वंचित आहेत. योगायोगाने शनिवारी (12 जानेवारी) या दोन्ही नेत्यांची भेट झाली आणि त्यांच्यात 25 मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. त्यांच्या चर्चेचा संवाद समजला नसला, तरी विनायक मेटेंची नाराजी उघड आहे. या दोघांमधील गुफ्तगूची राजकीय वर्तुळात चर्चा होत असून यामुळे काही नवीन समीकरणे उदयाला येणार का, असे संकेत मात्र यातून दिसत आहेत.

प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत शनिवारी बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन निर्धार मेळावा झाला. त्यासाठी आंबेडकर शुक्रवारी रात्रीच बीडमध्ये आले होते. नियमित दौऱ्यानिमित्त योगायोगाने आमदार विनायक मेटेही बीडमध्ये होते. शासकीय विश्रामगृहावर थांबलेल्या आंबेडकर यांना भेटण्यासाठी सकाळी साडेदहाच्या दरम्यान विनायक मेटे यांचा ताफा शासकीय विश्रामगृहावर पोचला. सुरुवातीला मेटेंनी पुष्प गुच्छ देऊन आंबेडकरांचे स्वागत केले. काय, कसे अशी विचारपूस झाल्यानंतर दोघे विश्रामगृहाच्या खोलीत गेले आणि त्या दोघांनी तब्बल 25 मिनीटे बंद दाराआड  संवाद साधला.

आज घडीला विनायक मेटेंचा शिवसंग्राम पक्ष सत्ताधारी महायुतीत असला, तरी त्यांना भाजपने सत्तेच्या पदापासून वंचित ठेवलेले आहे. एवढे कमी की काय, स्थानिक भाजपाकडूनही त्यांच्या पक्षाचा वारंवार अपमान केला जात आहे. त्यामुळे भाजपवरील नाराजी त्यांनी अनेकवेळा उघड बोलून दाखविलेली आहे. आजच्या बैठकीतील चर्चेच्या संवादाचा  तपशील बाहेर आलेला नसला तरी वंचित आघाडी आणि मेटेंची नाराजी यातून काही नवे समीकरण तर उदयास येणार नाही ना, अशी शक्‍यताही वर्तविली जात आहे.

वाशिम व आकोला जिल्ह्यात भारिप बहुजन महासंघ आणि विनायक मेटेंच्या शिवसंग्राममध्ये यापूर्वी राजकीय समीकरणे जुळलेली आहेत. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी आणि आता भाजपमध्ये नाराज असल्याने पुढे काय, असा प्रश्न मेटेंसमोर आहेच. त्यामुळे बंद दाराआडच्या चर्चेत वंचित बहुजन आघाडी – शिवसंग्राम अशी तर काही खलबते झाली नसतील ना, अशीही चर्चा  राजकीय वर्तुळात होत आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI