मोदींचे कपडे फाडून संधीचं सोनं करा : प्रकाश आंबेडकर

मोदींचे कपडे फाडून संधीचं सोनं करा : प्रकाश आंबेडकर

बुलडाणा: पंतप्रधान मोदींचे कपडे फाडून संधीचं सोनं करा, त्यांना सत्तेतून खाली खेचा, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यापाऱ्यांना केलं. ते बुलडाण्यात बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी करुन व्यापाऱ्यांना लुटले. त्यामुळे व्यापार बुडला, असा आरोप करत, प्रकाश आंबेडकरांनी मोदींना सत्तेतून खाली खेचण्याचं आव्हान केलं.

“नोटबंदी करताना नोटांवर जर गव्हर्नरची सही आहे, तर नोटांची सर्व मालकीही गव्हर्नरची असायला हवी. कोणत्याही नोटा बदलून देण्याचे काम हे त्यांचेच आहे. मग मोदींनी नोटबंदी कशी केली? हा अधिकार मोदींना कोणी दिला? असे प्रश्न भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले.

नोटबंदी करुन 40 टक्के टॅक्स भरुन घेतल्याने हा एकप्रकारे मोदींनी दरोडाच टाकला, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.

प्रकाश आंबेडकर यांची बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर इथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बळीराम  सिरस्कार यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली होती. त्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी आघाडी सरकारसह पंतप्रधान मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला केला.

उद्धव ठाकरे म्हणतात की सरकारवर अंकुश ठेवायचे काम ते करतात, तर मग गुजरातच्या हिरे व्यापाऱ्यांना त्यांच्या उद्योगासाठी 1 लाख कोटी रुपयांचं अनुदान कसे दिले? कारण हे सरकार शेतकऱ्यांचे नसून फक्त कारखानदारांचे आहे, असा हल्लाबोल आंबेडकरांनी केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI