Nagar Parishad Election 2025 : पुण्यात प्रतिष्ठेच्या नगरपरिषदेत महायुतीमध्येच सामना, एकनाथ शिंदे कोणाच्या बाजूने? अजित दादा कि भाजप?
Nagar Parishad Election 2025 : उत्तर पुणे जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या नगर परिषद निवडणुकीत महायुतीत फूट पडली आहे. भाजप आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीमध्ये मुख्य सामना आहे. यात एकनाथ शिंदेंची भूमिका सुद्धा महत्वाची ठरु शकते.

स्थानिक स्वराज्य संस्थेत पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगर पंचायतीसाठी निवडणूक होत आहे. 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी आहे. आज उमदेवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. मित्र पक्षातील नाराजी, रुसवे, फुगवे वाढले आहेत. अलीकडेच राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष महायुती VS महाविकास आघाडीतील पक्ष सर्वच ठिकाणी एकत्र निवडणूक लढवत नाहीयत. काही ठिकाणी ते परस्पराविरोधात निवडणूक रिंगणात आहेत.
उत्तर पुणे जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या आळंदी नगर परिषद निवडणुकीत महायुतीमधील प्रमुख पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत. नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी स्वतंत्र उमेदवार दिल्याने महायुतीत फूट पडली आहे. कुऱ्हाडे विरुद्ध कुऱ्हाडे अशी नगराध्यक्षपदासाठी थेट लढत आहे. आळंदी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी ही लढत लक्षवेधी ठरली आहे. नगराध्यक्ष जनतेतून निवडला जाणार आहे.
शिंदे गटाची भूमिका काय?
प्रशांत पोपट कुऱ्हाडे हे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. प्रकाश पंढरीनाथ कुऱ्हाडे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीने मात्र अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार दिलेला नाही. महायुतीतील इतर पक्षांची भूमिका अस्पष्ट असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान महायुतीतील आणखी एक घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेने नगरसेवक पदासाठी काही जागांवर उमेदवार दिले आहेत. मात्र नगराध्यक्षपदासाठी ते कोणाला पाठिंबा देतात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ठाकरे गटाच्या शिवसेनेने देखील काही जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.
आळंदी नगर परिषद निवडणुकीची आकडेवारी
एकूण मतदार: 25,331 पुरुष मतदार: 13,501 महिला मतदार: 11,827 इतर मतदार: 03
जागा: 10 प्रभागांमधील 21 नगरसेवकांच्या जागेसाठी मतदान. आरक्षण: महिलांसाठी 11 जागा आरक्षित.
निवडणुकीतील प्रमुख पाच मुद्दे
स्थानिक नागरिकांच्या समस्या आणि मूलभूत सुविधांचा अभाव हे निवडणुकीतील प्रमुख मुद्दे आहेत.
वाहतूक कोंडी: वारकरी आणि स्थानिकांसाठी जटील समस्या
आरोग्य: आरोग्य सुविधांची वानवा
पिण्याचे पाणी: शहराला भेडसावणारी पाण्याची समस्या
कचरा: कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न
मूलभूत सुविधांचा अभाव: स्थानिक नगर परिषदेसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची कमतरता
