खंडेरायाच्या जेजुरीत पुतळ्याचे राजकारण, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादी आमनेसामने

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यावरुन जेजुरीत सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादीत जुंपल्याचे चित्र आहे. 

खंडेरायाच्या जेजुरीत पुतळ्याचे राजकारण, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादी आमनेसामने

पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीमध्ये आता पुतळ्याचे राजकारण रंगले आहे. जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या वतीने जेजुरी नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आता चार वर्षांनंतरही शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला गेला नसल्याने शिवप्रेमींनकडून पुतळा उभारण्याची जोरदार मागणी होत आहे. जेजुरीत सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादीत जुंपली असल्याचे चित्र आहे. (Pune Jejuri Chhatrapati Shivaji Maharaj Statue Politics in NCP Congress)

शहाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या पितापुत्रांची भेट जेजुरी नगरीमध्ये झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जेजुरी नगरीत पुणे-पंढरपूर महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा लवकरात लवकर उभारावा, ही जेजुरीकरांची मागणी आहे.

पुरंदर तालुक्यातील सासवडमधील भव्य अश्वारुढ पुतळ्याच्या धर्तीवर जेजुरीतही छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारु, असे आश्वासन देत जेजुरी नगरपरिषदेच्या गेल्या निवडणुकीत काँग्रेसचा गट सत्तेत आला, मात्र सत्तेत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याबाबत कोणतीच ठोस भूमिका घेतल्याचे चित्र दिसून आले नाही.

शिवप्रेमींकडून हा पुतळा उभारण्याची मागणी करण्यात येत आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत यांनी राजकारण बाजूला ठेवून महाराजांचा पुतळा लवकरात लवकर उभारावा अशी मागणी केली आहे.

जेजुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी मात्र आपण आश्वासनावर ठाम असल्याचे सांगितले. निवडणुकीच्या आधी शब्द पूर्ण करु, शिवप्रेमींचा ऊर अभिमानाने भरुन येईल असा महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

जेजुरी नगरपरिषदेतील राष्ट्रवादीचे पक्षनेते जयदीप बारभाई यांनी मात्र सत्ताधाऱ्यांनी गेल्या चार वर्षात महाराजांचा पुतळा का उभारला नाही? असा संतप्त सवाल केला आहे.

जेजुरीत सत्ताधारी, विरोधक आणि सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी एकत्र येत मतभेद विसरुन छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा लवकरात लवकर उभारावा, हीच अपेक्षा सामान्य जेजुरीकर नागरिक व्यक्त करत आहेत. (Pune Jejuri Chhatrapati Shivaji Maharaj Statue Politics in NCP Congress)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *