…आणि राज ठाकरे उर्दू पेपरमध्ये झळकले!

Namrata Patil

|

Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

नांदेड: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज (12 एप्रिल) संध्याकाळी नांदेडमध्ये सभा घेणार आहेत. या सभेसाठी राज ठाकरे नुकतेच नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. सध्या संपूर्ण नांदेडमध्ये फक्त राज ठाकरे यांच्या सभेचीच चर्चा रंगली आहे. राज ठाकरे यांच्या नांदेडमध्ये सभेला गर्दी जमावी यासाठी चक्क उर्दू वर्तमानपत्रात जाहिराती देण्यात आल्या आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी दहा […]

...आणि राज ठाकरे उर्दू पेपरमध्ये झळकले!
Follow us

नांदेड: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज (12 एप्रिल) संध्याकाळी नांदेडमध्ये सभा घेणार आहेत. या सभेसाठी राज ठाकरे नुकतेच नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. सध्या संपूर्ण नांदेडमध्ये फक्त राज ठाकरे यांच्या सभेचीच चर्चा रंगली आहे. राज ठाकरे यांच्या नांदेडमध्ये सभेला गर्दी जमावी यासाठी चक्क उर्दू वर्तमानपत्रात जाहिराती देण्यात आल्या आहे.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी दहा सभेचे आयोजन केले आहे. यातील पहिली सभा आज संध्याकाळी 5.30 वाजता नांदेडमध्ये पार पडणार आहेत. नांदेड हा काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला आहे नांदेडच्या या सभेसाठी काल मुंबई देवगिरी एक्स्प्रेसने राज ठाकरे मनसैनिकांसह रवाना झाले. नांदेडमध्ये दाखल होताच त्यांनी सर्वप्रथम नांदेडच्या प्रसिद्ध गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतले.

दरम्यान राज ठाकरे यांच्या सभेची चर्चा नांदेडमधल्या सर्व उर्दू वर्तमानपत्रात जाहिराती स्वरुपात पाहायला मिळत आहे. नांदेडमधील प्रसिद्ध उर्दू वर्तमानपत्रात पहिल्या पानावर राज यांची जाहिरात देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे चक्क मराठी भाषेत या जाहिराती देण्यात आल्या आहेत. ‘जे बोलतो ते पुराव्यासहित बोलतो’ असे या जाहिरातीत म्हटले आहे. मराठी माणसांच्या स्वाभिमानासाठी लढणारे राज पहिल्यांदाच उर्दू जाहिरातीत झळकले आहेत. राज ठाकरेंच्या सभेला गर्दी जमावी या उद्देशाने हा पॅटर्न वापरण्यात आल्याची सर्वत्र चर्चा आहे. पण या पॅटर्नचा उपयोग राज ठाकरे आणि आघाडीला होतो का हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

नुकतीच नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चर्चेचे आयोजन करण्यात आले  होते. या सभेत मोदींनी आघाडी सरकारवर टिका केली. नांदेडच्या या सभेचा प्रभाव अद्याप जनतेवरुन ओसरलेला नाही. त्यानंतर आज नांदेडमध्ये राज ठाकरे यांची सभा पार पडणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच राज यांच्या सभेमुळे काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांना कितपत फायदा होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नुकतच पार पडलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी या निवडणुकीत मनसेने एकही उमेदवार न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात प्रचार करण्याचं जाहीर केलं होतं. माझ्या या सभांचा फायदा आघाडीला होत असेल तर तो होऊ द्या, असंही राज ठाकरेंनी म्हटलं होतं.

नांदेड शहरातील नवीन मुंडा मैदानावर आज सायंकाळी साडे पाच वाजता राज ठाकरेंची सभा होईल. यानंतर 15 तारखेला सोलापूर, 16 तारखेला कोल्हापूर, 17 तारखेला सातारा, 18 तारखेला पुणे आणि 19 तारखेला रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये राज ठाकरे यांची सभा होईल. या सर्व सभांची वेळ सायंकाळी साडे पाच वाजता ठेवण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ:


Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI