रामटेकमध्ये उमेदवारी अर्जावरुन काँग्रेसमध्ये नाट्य, एका मतदारसंघासाठी दोन उमेदवार

रामटेकमध्ये उमेदवारी अर्जावरुन काँग्रेसमध्ये नाट्य, एका मतदारसंघासाठी दोन उमेदवार

नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रासह देशभरात अर्ज भरण्याची लगबग पाहायला मिळत आहे.  11 एप्रिल आणि 18 एप्रिल दरम्यान होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात चांगलीच गर्दी केली. पण तिकडे नागपूरच्या रामटेक मतदारसंघात वेगळंच चित्र पाहायला मिळालं. काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांनी रामटेक या एकाच मतदारसंघासाठी अर्ज केला. रामटेक जिल्हाधिकारी कार्यालयात दोन्ही दिग्गजांनी अर्ज भरण्यासाठी उपस्थिती लावली.

नागपूर जिल्ह्यातील रामटेक हा लोकसभा मतदार संघ अनुसुचित जमातीसाठी राखीव आहे. फेब्रुवारी महिन्यात सेवानिवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. किशोर गजभिये यांचे नाव रविवारी रात्री उशिरा रामटेक लोकसभेसाठी जाहीर झाले, त्यानुसार त्यांनी सकाळच्या सत्रात जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र दुपारच्या वेळी अचानक काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी आपल्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजेरी लावली.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपल्यानंतर नितीन राऊत कार्यालयातून बाहेर आले. त्यांनी कोणत्या पक्षाकडून अर्ज भरला, त्यांनी नक्की अर्ज भरला का याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. परंतु राऊत यांना उमेदवारी अर्ज भरण्याबाबत हायकमांडकडूनच आदेश आल्याचं समर्थकांचे म्हणणं आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा एबी फॉर्म वेळेत न पोहोचल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला नाही. पण एका उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली असताना, दुसरा उमेदवार अर्ज भरण्यास दाखल होतो, यावरुन काँग्रेसमध्ये किती प्रमाणात गटबाजी आहे हे प्रकर्षाने दिसून येते.

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली असून येत्या 11 एप्रिल रोजी महाराष्ट्रात पहिले मतदान पार पडणार आहे.

संबंधित बातम्या

युती, आघाडी आणि बहुजन वंचित आघाडी, कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI