खोतकरांच्या माघारीनंतर दानवेंची पहिली प्रतिक्रिया

खोतकरांच्या माघारीनंतर दानवेंची पहिली प्रतिक्रिया

औरंगाबाद : शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचं बंड थंड झालं आहे. औरंगाबादमधील शिवसेना-भाजपच्या संयुक्त मेळाव्यात अर्जुन खोतकर यांनी जाहीर माघार घेतली. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि जालना मतदरासंघातील विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे. खोतकरांच्या माघारीनंतर दोन्ही नेते युतीच्या औरंगाबादमधील सभेत एकत्रही दिसले.

“मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की, जिल्ह्यात आणीबाणी लागली होती. आणीबाणी उठली आहे.” असे औरंगाबादमधील युतीच्या मेळाव्यात अर्जुन खोतकर म्हणाले. त्यानंतर भाषणाला उभे राहिलेले रावसाहेब दानवेंनी खोतकरांना उत्तरादाखल म्हटलं, “अर्जुन खोतकर आणि माझा वैयक्तिक संघर्ष नव्हता. आणीबाणीत कुणाला झळ पोहोचली असेल, त्याला भरपाई देण्याचा प्रयत्न करु.” असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले.

“ज्यादिवशी युती झाली, त्याच दिवशी मी शास्त्र खाली ठेवले होते. आज अर्जुनानेही धनुष्य खाली ठेवलं आहे. सर्वात मजबूत युती ही जालना जिल्ह्यात होती. जिल्हा परिषद आम्ही दोघांनी तीस वर्षे ताब्यात ठेवली. आम्हाला विचारल्याशिवाय जिल्ह्यात पान हलत नव्हतं.”, असे म्हणत रावसाहेब दानवेंनी खोतकरांना गोंजारण्याचा प्रयत्नही केला.

“अर्जुन खोतकर यांना मी शब्द देतो, मागच्या काळात मी तुम्हाला धोका दिला नाही किंवा तुम्ही मला धोका दिला नाही. आपण दोघे नेत्यांसमोर बसलो आणि आपला वाद मिटला. तुम्ही परीक्षेत पास झालात, मी माझ्या परीक्षेत शंभर टक्के मार्क मिळवीन.” असे म्हणत रावसाहेब दानवेंनी अर्जुन खोतकरांना उद्देशून म्हटलं.

खोतकरांची माघार

शिवसेनेचे जालन्यातील नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचं बंड अखेर थंड पडलं आहे. औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत अर्जुन खोतकर यांच्याशी चर्चा झाली. या बैठकीनंतर अर्जुन खोतकर यांनी जालन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबादमधील शिवसेना-भाजपच्या मेळाव्यातील भाषणातून अर्जुन खोतकर यांनी माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यामुळे जालन्यात रावसाहेब दानवे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खोतकरांची समजूत काढण्यात यशस्वी ठरले आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे?

जालना जिल्ह्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा छत्तीसचा आकडा आहे. त्यातच महिन्या-दोन महिन्यांपासून अर्जुन खोतकर लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा आपणच पराभव करणार असल्याचे सांगत होते. किंबहुना, आपणच दानवेंविरोधात लाढणार असल्याचेही खोतकरांनी म्हटले होते. शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते, त्यामुळे खोतकरांच्या बोलण्याला महत्त्व आले होते. मात्र, ऐनवेळी उद्धव ठाकरेंनी अमित शाहांच्या सोबत पत्रकार परिषद घेऊन शिवसेना-भाजप युतीची घोषणा केली आणि अर्जुन खोतकरांना घोषणांना धक्का बसला. मात्र, तरीही अर्जुन खोतकर मागे हटण्यास तयार नव्हते. जालन्यात मैत्रीपूर्ण लढत व्हावी, असे म्हणत अखेरपर्यंत अर्जुन खोतकर लढण्यावर ठाम राहिले. मात्र, अखेर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांचे बंड थंड करण्यात यश आलंय.

Published On - 3:23 pm, Sun, 17 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI