संजय राऊत यांनी ‘लीलावती’तून लिहिलेल्या अग्रलेखात कोणावर तोफ?

आघाडीसोबत जाण्याच्या शिवसेनेच्या निर्णयावर टीका करणाऱ्या भाजपला संजय राऊतांनी खडे बोल सुनावले आहेत.

संजय राऊत यांनी 'लीलावती'तून लिहिलेल्या अग्रलेखात कोणावर तोफ?

मुंबई : अँजिओप्लास्टीनंतर लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी हॉस्पिटलच्या बेडवरुनच स्वतःच्या हाताने अग्रलेख लिहिला. या अग्रलेखात नेमकं काय आहे, याची उत्सुकता ‘सामना’च्या वाचकांना लागली होती. आघाडीसोबत जाण्याच्या शिवसेनेच्या निर्णयावर टीका करणाऱ्या भाजपला राऊतांनी खडे बोल (Saamana Editorial from Lilavati Hospital) सुनावले आहेत.

राष्ट्रपती राजवटीची शिफारस ही घोडेबाजाराच्या दिशेने पावलं पडण्याची सुरुवात आहे, असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या मातीचा स्वाभिमान राखण्यासाठी आम्हाला स्वतंत्र पावलं उचलावी लागत आहेत, असे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत. विंदा करंदीकरांच्या ‘सब घोडे बारा टक्के’ या कवितेच्या शीर्षकानुरुप अग्रलेखाची सुरुवात केली आहे.

‘सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टक्के या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधळ व भेसळ करत आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात जो खेळ मांडला आहे त्यामुळे कुणाचा कंडू शमणार असेल तर त्याने जरूर खाजवत बसावे.’ असा टोला लगावण्यात आला आहे.

‘शिवसेनेची पावले कोणत्या दिशेने पडत आहेत त्यावर टीका आणि टिपण्या करुद्यात. काश्मीरात मेहबुबा व बिहारात नितीशकुमार यांच्याशी ” घरोबा ” करताना तत्वे आणि विचारांचे काय झाले?’ असा सवाल करण्यात आला आहे.

‘बिहारमध्ये जनादेश नितीशकुमार व लालू यादवांना होता. तो जनादेश मोडून भाजप व नितीशकुमारांचा “पाट” लागलाच ना ! महाराष्ट्रात स्थिर राज्य यावे, ते लवकरात लवकर यावे, महाराष्ट्राच्या हिताचे व जनतेच्या कल्याणाचे काही घडावे हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना’ असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

अग्रलेखाचं वैशिष्ट्यं काय?

यापूर्वी ‘सामना’ कार्यालय किंवा मुंबई-दिल्लीतील निवासस्थानावरुन, खासदार म्हणून देश-परदेशातील शासकीय दौरे, कुटुंबासह देश-परदेशात भटकंती, विमानात, जहाजात अशा विविध ठिकाणी, विविध प्रसंगात संजय राऊत यांनी ‘सामना’चे अग्रलेख लिहिले आहेत. परंतु रुग्णालयातून संपादकीय लिहिण्याची ही पहिल्यांदाच वेळ आली आहे.

रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना आणि महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच, सत्ता स्थापनेवेळी शिवसेनेची झालेली कोंडी, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असताना त्यांनी हे संपादकीय (Saamana Editorial from Lilavati Hospital) लिहिले आहे.

संजय राऊत रुग्णालयात

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हृदयात दोन ब्लॉकेज असल्याचं निदान अँजिओग्राफीमध्ये झालं आहे. त्यामुळे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. संजय राऊत यांना सोमवारी दुपारी अस्वस्थता जाणवू लागल्याने लीलावती रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं होतं. मात्र राऊत यांची लेखणी रुग्णालयातही त्याच वेगाने चालत होती.

संजय राऊतांच्या लेखणीला तीच धार, तोच वेग, ‘सामना’चं संपादकीय थेट लीलावती रुग्णालयातून

संजय राऊत यांच्या लेखणीची धार संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. संजय राऊत यांची लेखणी आणि गेल्या 8-10 दिवसांपासून सुरु असलेल्या पत्रकार परिषदा, यामुळे शिवसेना सत्तास्थापनेच्या ड्रायव्हिंग सीटवर पाहायला मिळाली. मात्र अटीतटीच्या क्षणी संजय राऊत यांची प्रकृती काहीशी बिघडली आणि त्यांना रुग्णालयात जावं लागलं.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही लीलावती रुग्णालयात जाऊन संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरेही भेट घेऊन आल्या. संजय राऊत यांच्या भेटीला भाजपचे नेतेही दाखल झाले होते. आशिष शेलार आणि हर्षवर्धन पाटील राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यानंतर ‘लीलावती’च्या विशेष कक्षात संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात गुफ्तगू (Saamana Editorial from Lilavati Hospital) झालं.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI