SambhajiRaje Chatrapati : उद्धव ठाकरेंच्या निरोपानंतरही संभाजीराजे छत्रपती भूमिकेवर ठाम?, अपक्ष म्हणूनच सर्वपक्षीयांनी पाठिंबा देण्याचं आवाहन

उद्या दुपारी 12 वाजता वर्षा बंगल्यावर शिवबंधन बांधण्यासाठी या, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंना दिला आहे. मात्र, संभाजीराजे आपल्या अपक्ष लढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेसोबत गेल्यास आपला जनाधार कमी होईल, अशी भीती संभाजीराजेंना आहे.

SambhajiRaje Chatrapati : उद्धव ठाकरेंच्या निरोपानंतरही संभाजीराजे छत्रपती भूमिकेवर ठाम?, अपक्ष म्हणूनच सर्वपक्षीयांनी पाठिंबा देण्याचं आवाहन
संभाजीराजे छत्रपती
प्रदीप कापसे

| Edited By: सागर जोशी

May 22, 2022 | 5:42 PM

पुणे : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जून रोजी मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) भाजपचे 2 आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येईल इतकं संख्याबळ आहे. अशावेळी सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मदत करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीय. त्याचवेळी शिवसेनेकडूनही दुसरा उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे संभाजीराजेंची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर आज संभाजीराजे आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळात हॉटेल ऑबेरॉयमध्ये बैठक पार पडली. यावेळी शिवसेना नेत्यांनी संभाजीराजे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) निरोप दिल्याची माहिती मिळतेय. उद्या दुपारी 12 वाजता वर्षा बंगल्यावर शिवबंधन बांधण्यासाठी या, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंना दिला आहे. मात्र, संभाजीराजे आपल्या अपक्ष लढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेसोबत गेल्यास आपला जनाधार कमी होईल, अशी भीती संभाजीराजेंना आहे.

संभाजीराजे आणि शिवसेना नेत्यांमध्ये हॉटेल ट्रायडंटमध्ये महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप संभाजीराजेंना दिला. उद्या दुपारी 12 वाजता शिवबंधन बांधण्यासाठी वर्षावर यावे, असा हा निरोप आहे. शिवाय शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही संभाजीराजेंना फोन केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता संभाजीराजे छत्रपती काय निर्णय घेतात असा प्रश्न विचारला जात होता. त्याच वेळी संभाजीराजे छत्रपती आपल्या अपक्ष लढण्याच्या भूमिकेवर ठाण असल्याची माहिती मिळतेय. अपक्ष म्हणूनच सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा द्यावा असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं आहे. शिवसेनेसोबत गेल्यास जनाधार कमी होईल अशी भीती संभाजीराजे यांना आहे.

दोन वेळा संभाजीराजे आणि उद्धव ठाकरे भेट

राज्यसभा निवडणूक अपक्ष लढण्याची घोषणा केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दोन वेळा भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्याला पाठिंबा देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. मात्र, संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा आणि शिवसेनेकडून राज्यसभा निवडणूक लढवावी असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी ठेवला, अशी माहिती मिळतेय. त्यानंतर शरद पवार यांनीही आपली भूमिका बदलल्यानं संभाजीराजेंची कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर आज पुन्हा एकदा शिवसेनेचं शिष्टमंडळ आणि संभाजीराजे यांच्यात बैठक पार पडली. त्यामुळे राज्यसभा निवडणूक आता रंगतदार होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

पवारांनी भूमिका बदलल्यानं संभाजीराजेंची कोंडी?

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली. तसंच सर्व राजकीय पक्षांना सहकार्याचं आवाहन केलं. मात्र, शिवसेनेकडून दुसरा उमेदवार दिला जाण्याची घोषणा करण्यात आली. इतकंच नाही तर संभाजीराजे यांना शिवसेनेकडून ही जागा लढवण्याचा प्रस्तावही देण्यात आला. अशावेळी सुरुवातीला पाठिंबा देणारे शरद पवार यांनी आपली भूमिका बदलली. शिवसेना ज्या कुणाला उभा करेल त्याला आमची शिल्लक मते देऊ, असं पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे महाविकास आघाडीकडून संभाजीराजे यांची कोंडी करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें