माजी पोलिस आयुक्तांची ‘कृपा’, कृपाशंकर सिंग यांच्या भ्रष्टाचाराची फाईल भाजपच्या ‘वॉशिंग मशिन’मध्ये स्वच्छ : संजय राऊत

मुंबईतील माजी पोलिस आयुक्तांच्या साथीने काँग्रेसचे माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली भाजपच्या राज्यात स्वच्छ झाल्या, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'रोखठोक'मधून केला आहे

माजी पोलिस आयुक्तांची 'कृपा', कृपाशंकर सिंग यांच्या भ्रष्टाचाराची फाईल भाजपच्या 'वॉशिंग मशिन'मध्ये स्वच्छ : संजय राऊत

मुंबई : भाजपच्या मार्गावर असलेले काँग्रेसचे माजी मंत्री कृपाशंकर सिंग (Sanjay Raut on Kripashankar Singh) यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली भाजपच्या राज्यात ‘वॉशिंग मशिन’मध्ये स्वच्छ धुऊन निघाल्या. या कामी मुंबईच्या एका तत्कालीन पोलिस आयुक्तांनी मोठी भूमिका बजावली, असा दावा करत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Kripashankar Singh) यांनी खळबळ उडवली आहे.

‘सामना’मधील ‘रोखठोक’ सदरात संजय राऊत यांनी हा दावा केला आहे. ‘मला सगळ्यात आश्चर्य वाटतं ते मुंबईतील काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांचं. कृपाशंकर सिंह हे मुंबईतील उत्तर भारतीयांचे मोठे नेते. भ्रष्टाचार आणि बेहिशेबी संपत्ती प्रकरणात त्यांच्यावर ‘ईडी’ आणि अँटिकरप्शन विभागातर्फे गुन्हे दाखल झाले. चौकशीत बरंच घबाड उघड झालं. हे सर्व चौकशी प्रकरण काँग्रेस राजवटीत सुरु झालं. पण भाजपच्या राज्यात त्यांच्या सर्व फायली ‘वॉशिंग मशिन’मध्ये धुऊन स्वच्छ केल्याने त्यांच्या विरोधात खटला दाखल करण्यास नव्या राजवटीत परवानगी नाकारली.’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

‘मुंबईच्या एका तत्कालीन पोलिस आयुक्ताने या कामात मोठी भूमिका बजावली. तेव्हाच कृपाशंकर हे भाजपमध्ये जातील हे नक्की झालं होतं. तरी ते बराच काळ थांबले. आता त्यांनी पक्षत्याग केला. अद्याप तरी त्यांना स्वर्गाचं दार उघडलं गेलेलं नाही, मात्र नजीकच्या भविष्यात काय होईल हे दिसेलच.’ असे आरोप राऊत (Sanjay Raut on Kripashankar Singh) यांनी केले आहेत. मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांकडे अंगुलीनिर्देश करताना संजय राऊत यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, हे स्पष्ट झालेलं नाही.

भाजप आणि विरोधकांमध्ये सध्या ‘धुलाई युद्ध’ रंगलं आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. भाजपकडे अशी कोणती वॉशिंग पावडर आहे? असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला होता. तर भाजप वॉशिंग पावडर वापरत नाही. आमच्याकडे विकासाचं डॅशिंग रसायन आहे, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं.

कोण आहेत कृपाशंकर सिंग?

कृपाशंकर सिंग हे काँग्रेसचे मुंबईतील वरिष्ठ नेते होते. उत्तर भारतीयांची मतं काँग्रेसकडे वळवण्यात कृपाशंकर सिंग यांचा मोलाचा वाटा मानला जात असे. काँग्रेसच्या सत्ताकाळात 2004 मध्ये कृपाशंकर सिंग हे राज्यमंत्री होते.

2009 साली विधानसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं. त्याचं बहुतांश श्रेय कृपाशंकर सिंग यांना जातं, असं मानलं जातं. याच विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का बसला होता.

मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद, आमदार, राज्यमंत्री, अशी पदं काँग्रेसमध्ये कृपाशंकर सिंग यांनी भूषवली आहेत.

भाजपच्या वाटेवर

विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला गटबाजीचं ग्रहण लागलं असतानाच कृपाशंकर सिंग यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. कृपाशंकर सिंग यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे राजीनामा सोपवला. गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या चर्चांनुसार कृपाशंकर सिंग हे भाजपात प्रवेश करणार आहेत.

संबंधित बातमी :

काँग्रेसला मोठा धक्का, माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांचा पक्षाला रामराम

Published On - 12:51 pm, Sun, 15 September 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI