आव्हाडांना साथ द्या, तुमचा हा प्रतिनिधी महाराष्ट्राचा चेहरा बदलेल : शरद पवार

लोकांनी साथ दिली तर काहीही होऊ शकतं. अशीच साथ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना द्या, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केलं (Sharad Pawar On jitendra Aawhad).

  • Publish Date - 12:08 am, Mon, 27 January 20 Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
आव्हाडांना साथ द्या, तुमचा हा प्रतिनिधी महाराष्ट्राचा चेहरा बदलेल : शरद पवार

ठाणे : लोकांनी साथ दिली तर काहीही होऊ शकतं. अशीच साथ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना द्या, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केलं (Sharad Pawar On jitendra Aawhad). यावेळी त्यांनी तुमचा हा प्रतिनिधी महाराष्ट्राचा चेहार बदलेल, अशी मला खात्री आहे, असंही सांगितलं. ते ठाण्यात जितेंद्र आव्हाड आणि त्यांची पत्नी ऋता आव्हाड यांच्या जाहीर नागरी सत्काराच्या कार्यक्रमात बोलत होते (Sharad Pawar On jitendra Aawhad).

शरद पवार म्हणाले, “जिथं कर्तुत्व असतं, त्या कर्तुत्वाला प्रोत्साहित करण्याची भूमिका घेतली, तर समाजातील प्रश्नाची सोडवणूक करणारं नेतृत्व उभं राहू शकतं. जितेंद्र आव्हाड यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हे दाखवून दिलं आहे. मागील अनेक वर्षे ठाण्याच्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात जे योग्य असेल त्याचा आव्हाड यांनी नेहमीच पुरस्कार केला. यातून स्वतःचं एक स्थानही त्यांनी प्रस्थापित केलं.”

उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये ज्यांना कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेले आणि स्वतःचं कर्तुत्व असलेले लोक मंत्री झाले. ठाणेकरांना असे दोन मंत्री मिळाले. त्या दोघांच्या कामातून महाराष्ट्र बदलेल असंही पवारांनी नमूद केलं.

“लोकप्रतिनिधी जागृक असला तर काय होतं कळवा मुंब्रामध्ये पाहा”

शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचं यावेळी भरभरुन कौतुक केलं. ते म्हणाले, “एक लोकप्रतिनिधी जागृक असला आणि त्याला जनतेने साथ दिली तर काय होऊ शकतं हे तुम्ही कळवा-मुंब्रामध्ये जाऊन पाहा, असं आम्ही नव्या कार्यकर्त्यांना सांगत असतो. म्हणून तुम्हा सर्वांची साथ त्यांच्यासोबत अशीच ठेवा. मी तुम्हाला खात्री देतो की हा तुमचा प्रतिनिधी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील लोकांच्या जीवनातही बदल करण्यातही यशस्वी होईल. याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. त्याचा तुम्हा सर्वांना सार्थ अभिमान असेल, याचीही मला खात्री आहे.”

यशवंतराव चव्हाण यांनी मला भाषण झाल्यावर बोलावून घेतलं आणि विचारपूस केली. त्यांनीच मला मोठं केलं, असं सांगत शरद पवार यांनी आपली एक आठवणही सांगितली. ते म्हणाले, “यशवंतराव चव्हाण यांनी मला एका ठिकाणी भाषण करताना ऐकलं. भाषणानंतर त्यांनी मला बोलावून घेत माहिती घेतली. तेव्हापासून मी मोठा होत गेलो. बाळासाहेब ठाकरे यांनीही मला साथ दिली.”