बंड थंड? अर्जुन खोतकर अखेर माघार घेणार : सूत्र

बंड थंड? अर्जुन खोतकर अखेर माघार घेणार : सूत्र

औरंगाबाद : जालना लोकसभेचा तिढा अखेर आज सुटणार असल्याचे चिन्ह आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीनंतर अर्जुन खोतकर माघार घेतील, अशी माहिती शिवसेना-भाजपमधील सूत्रांनी दिली आहे. आज सकाळी 11.30 वाजता या चारही नेत्यांमध्ये बैठक होणार आहे.

औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजप युतीचा मेळावा आहे. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे एकाच विमानातून येतील, तर दुसरीकडे अर्जुन खोतकर 11 वाजेपर्यंत जालन्यातून औरंगाबादला दाखल होतील. त्यानंतर या चारही नेत्यांमध्ये एका खासगी हॉटेलमध्ये बैठक होईल.

या बैठकीनंतर अर्जुन खोतकर माघार घेणार, असे सूत्रांनी सांगितले आहे. मात्र, अर्जुन खोतकर स्वत: काय भूमिका जाहीर करतात, याकडे राजकीय वर्तुळासह महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. युती झाली किंवा नाही झाली, तरी जालन्यातून मी लढमारच, अशी अटीतटीची भूमिका अर्जुन खोतकर यांनी घेतली होती. मात्र, भाजप-सेनेच्या राज्य नेतृत्त्वाला खोतकरांची समजूत काढण्यात यश आल्याची शक्यता आहे.

VIDEO : खोतकर-दानवे वादाचा लाईव्ह व्हिडीओ

दुसरीकडे, अर्जुन खोतकर यांची समजूत काढण्यासाठी भाजप नेत्या आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही प्रयत्न सुरु केले आहेत. पंकजा मुंडे यांनी सातत्याने फोन करुन अर्जुन खोतकर यांचे बंड थंड करण्याचे प्रयत्न केले.

दानवे आणि खोतकरांचा वाद राज्यात तुफान गाजला. दोघांनी एकमेकांवर जाहीरपणे टीका केली. दानवेंविरोधात खोतकरांनी शड्डू ठोकला होता. दानवेंचा पराभव करणारच, अशा घोषणाही खोतकरांनी जालन्यातील सभांमधून जाहीरपणे दिल्या होत्या. त्यामुळे आता खोतकरांच्या माघारीमुळे दानवेंना मोठा दिलासा मिळणार आहे.


Published On - 10:26 am, Sun, 17 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI