उदयनराजेंविरोधात शिवसेनेचा उमेदवार ठरला!

उदयनराजेंविरोधात शिवसेनेचा उमेदवार ठरला!

सातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार ठरला आहे. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना शिवसेनेकडून सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना-भाजप युतीच्या कोल्हापुरातील प्रचाराच्या पहिल्या सभेतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र पाटलांच्या नावाची घोषणा केली.

माथाडी कामगारांचा नेता दिल्लीत गेला पाहिजे, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी साताऱ्याच्या जनतेला केले. तसेच, नरेंद्र पाटील यांची पळवापळवी मी केली नाही, तर नरेंद्र पाटलांना साताऱ्यासाठी मागून घेतले असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी नमूद केले.

राष्ट्रवादीचे साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले हे मोदी लाटेतही निवडून आले होते. राजघराण्यातील व्यक्तीमत्त्व आणि आपल्या मनमोकळ्या स्वभावामुळे उदयनराजे यांच्याबद्दल साताऱ्याच्या जनतेत नेहमीच आदर दिसून येतो. उदयनराजेंची लोकप्रियताही अफाट आहे. दुसरीकडे, शिवसेनेने माथाडी कामागारांचे नेते असलेल्या नरेंद्र पाटलांना उमेदवारी दिली आहे. अनेक माथाडी कामागारांचे मूळ गाव साताऱ्यात असल्याने नरेंद्र पाटलांच्या रुपाने उदयनराजेंना आव्हान मिळणार आहे. मात्र, प्रचंड फरकाने नेहमी विजयी होणाऱ्या उदयनराजेंना नरेंद्र पाटील किती आव्हान देऊ शकतील, याबाबत येणारी निवडणूकच ठरवेल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *