‘ही मेहरबानी नाही तर…’, उद्धव ठाकरे येण्याआधी शिवसेना आमदाराचे बोचरे शब्द
"सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम करत नाही.लवकर ते काम पूर्ण होईल. 100 टक्के कठोर पावलं उचलली पाहिजेत. काही ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करावे लागेल. काही अधिकारी सरळ करावे लागतील. त्याशिवाय हे सुधारणार नाही"

महायुती महापालिका निवडणुका एकत्र लढणार यावर कुडाळचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी आपले विचार मांडले आहेत. “चांगली गोष्ट आहे. आम्ही पूर्वीपासून तेच सांगत होतो. सगळीकडे तेच पाहिजे. जिल्हा परिषदांमध्ये ही तेच हवे. लोकसभा व विधानसभा या महायुती म्हणून लढलो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद आहे. नेते जे ठरवतील हे सर्वांना मान्य करावे लागेल. काही ठिकाणी कोडं असेल तर ते सोडवतील” असं निलेश राणे म्हणाले. निलेश राणे हे भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे सुपूत्र आहेत.
आज उद्धव ठाकरे नागपूर हिवाळी अधिवेशनाला येणार आहेत, त्यावर निलेश राणे बोलले. “व्हेरी गुड. आमदार असल्यावर यावेच लागते. एक दिवस येऊन काय साध्य होणार?. सात दिवस यायला पाहिजे. जेवढे दिवस अधिवेशन आहे, तेवढे दिवस यायला हवे. ही मेहरबानी नाही तर जबाबदारी आहे” असं निलेश राणे म्हणाले.
काही अधिकारी सरळ करावे लागतील
“शेतकऱ्यांना मदत लवकरात लवकर मिळावी ही आमची भूमिका आहे. केवायसी बाकी आहे. ती झाली की मिळेल” असं निलेश राणे म्हणाले. “मुंबई-गोवा महामार्गाचा विषय हा एनएचआयकडे आहे. फक्त एकच पॅच राहिला आहे. टोल अजून सुरु केलेला नाही. नॅशनल हायवेने हे काम करायचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम करत नाही.लवकर ते काम पूर्ण होईल. 100 टक्के कठोर पावलं उचलली पाहिजेत. काही ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करावे लागेल. काही अधिकारी सरळ करावे लागतील. त्याशिवाय हे सुधारणार नाही” असं निलेश राणे यांनी सांगितलं.
आसन व्यवस्था हा महत्त्वाचा विषय नाही
“मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये शेतकऱ्यांसाठी निधी गोळा केला असेल, तर तो त्यासाठी खर्च केला गेला पाहिजे. नंतर तांत्रिक कारणांसाठी नाही देता येत असं बोलणं संयुक्तिक नाही. खर्च करता येतो. मात्र सरकारची ती भूमिका नाही. अजून पॅकेज पोहोचलेले नाही. घोषणांची अतिवृष्टी झाली पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी पॅकेज मिळालेले नाही” असं काँग्रेसचे आमदार सतेज पाटील म्हणाले. ठाकरे गट आणि काँग्रेसमधील आसन वादावर ते म्हणाले की, “आसन व्यवस्था हा महत्त्वाचा विषय नाही. बेरोजगारी हा आमच्यासाठी ज्वलंत विषय आहे”
