राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना-राष्ट्रवादीचे हजारो पदाधिकारी मनसेत

शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती धरला.

राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना-राष्ट्रवादीचे हजारो पदाधिकारी मनसेत

मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यानंतरही स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनात खदखद दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सेना-राष्ट्रवादीच्या हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश (Incoming in MNS ) केला.

शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती धरला. यामध्ये रायगडमधील पेण, मुरुड भागातील कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याशिवाय विविध शहरं, तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांनीही मनसेची वाट धरली आहे.

स्थानिक नेत्यांची मनमानी, मान-सन्मान किंवा पद मिळत नाही, वरिष्ठ नेत्यांसमोर समस्या मांडूनही होणारं दुर्लक्ष यासारख्या कारणांमुळे सेना-राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनात खदखद होती. अखेर ती पक्षांतराच्या रुपाने बाहेर पडली.

मनसेच्या झेंड्यात आता भगवा रंग, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी नव्या झेंड्याचे अनावरण?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनाची दिशा बदलल्यानंतर आता झेंड्याचा रंग देखील बदलण्यात येणार असल्याचं बोललं  जात आहे. विधानसभा निवडणुकीत सूर न गवसलेल्या राज ठाकरे यांनी आता संस्थात्मक पातळीवर मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे संघटनेतील प्रतिकांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये आमूलाग्र बदल केले जाणार आहेत. या नव्या झेंड्यामध्ये आता भगवा रंग प्रामुख्याने दिसणार आहे. विशेष म्हणजे झेंड्यामध्ये शिवरायांची मुद्राही छापली जाणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी 23 जानेवारी रोजी मनसेचं पहिलं महाअधिवेशन आयोजित केलं आहे. याच दिवशी या झेंड्याचं अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राज ठाकरे आगामी काळात हिंदुत्वाच्या राजकारणाकडे झुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला राज ठाकरे यांनी पक्षाचं पहिलं महाअधिवेशन आयोजित केलं आहे. ‘या महाअधिवेशनापासून तुम्हाला नव्या स्वरुपातील राज ठाकरे पाहायला मिळतील, अशा शब्दांमध्ये संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंच्या नव्या राजकीय भूमिकेचे संकेत दिले होते.

शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली. त्यानंतर शिवसेनेचा दुखावलेला कट्टर हिंदुत्ववादी मतदार मनसेकडे खेचण्यासाठी आणि आगामी महापालिका निवडणुकीत मनसेची ताकद वाढवण्यासाठी ही रणनीती बनत असल्याचं बोललं जात आहे.

Incoming in MNS