मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप, औरंगाबाद पोलिसांकडून सलग 6 तास चौकशी

मागील वर्षाचा शेवटचा संपूर्ण आठवडा चर्चेत राहिला तो राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (NCP Mahebub Shaikh) यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांनी...

मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप, औरंगाबाद पोलिसांकडून सलग 6 तास चौकशी

मुंबई : मागील वर्षाचा शेवटचा संपूर्ण आठवडा चर्चेत राहिला तो राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (NCP Mahebub Shaikh) यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांनी… गेल्या 13 वर्षांपासून पक्षात काम करत असलेले मेहबूब शेख यांच्यावरील आरोपाने राष्ट्रावादीत एकच खळबळ माजली. युवक प्रदेशाध्यक्षावरच बलात्कारासारखा गंभीर आरोप झाल्यामुळे पक्षात सन्नाटा पसरला. परंतु मेहबूब शेख यांनी मुंबईतील राष्ट्रवादी भवनात घेतलेली पत्रकार परिषद आणि औरंगाबाद पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेली माहिती यामुळे बॅकफूटवर गेलेली राष्ट्रवादी पुन्हा फ्रंटफूटवर आली. पक्षातले युवा नेते तसंच सुरुवातीला या प्रकरणावर भाष्य न केलेले जेष्ठ नेत्यांनीही पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतर मेहबूब यांची बाजू घेतली. याचदरम्यान भाजपने राज्यभर आंदोलने केली. राज्यातील विविध शहरात प्रमुख नेत्यांनी आंदोलने छेडली. सध्या या प्रकरणाची सविस्तर चौकशी औरंगाबाद पोलिस करत आहेत. (Special Report On NCP Mahebub Shaikh Rape Case)

काय आहे प्रकरण?

औरंगाबाद पोलीस ठाण्यात मेहबूब इब्राहिम शेख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबाद शहरात शिकवण्या घेणाऱ्या एका अल्पसंख्याक तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले. 10 नोव्हेंबर रोजी मला फ्लॅटवर भेटण्यासाठी बोलावलं आणि 14 नोव्हेंबरच्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास भेटण्याच्या उद्देशाने गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेत बलात्कार केला, अशी तक्रार संबंधित तरुणीने औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मेहबूब शेख यांचा खुलासा

“औरंगाबादमधील सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मला पत्रकार मित्राकडून मिळाली. त्यानंतर मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आणि फिर्यादीच्या म्हणण्याप्रमाणे मेहबूब इब्राहिम शेख या व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी केली. मी कधीही संबंधित तरुणीला प्रत्यक्ष भेटलो नाही किंवा फोनवरही बोललेलो नाही. मी 10 आणि 11 तारखेला मुंबईत होतो. माझे मुंबईत कार्यक्रम होते. 14 नोव्हेंबरला मी बीड जिल्ह्यातील शिरुर कासार या माझ्या गावाकडे होतो. पोलिसांना सर्व पुरावे तसंच माहिती देण्यास मी तयार आहे. या प्रकरणामागे कोण आहे?, याचा पोलिसांनी शोध घ्यावा”, असं मेहबूब शेख म्हणाले.

मेहबूब शेख यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर याबाबत एक व्हिडीओ शेअर करत संबंधित तरुणीने केलेले सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. “संबंधित तरुणीशी माझा कसलाही संबंध नाही. मी तिला कधीही पाहिलं नाही किंवा भेटलेलो नाही. एखाद्या व्यक्तीने एवढ्या मेहतीने उभं केलेलं राजकीय आयुष्य इतक्या घाणेरड्या आरोपांनी उध्वस्त करु नये. यापाठीमागे कुणाचं षडयंत्र आहे?, या प्रकरणामागे कोण राजकीय लोकं आहेत?, त्या महिलेचा बोलविता धनी कोण आहे?, याची पोलिसांनी कसून चौकशी करावी. गरज पडली तर माझी नार्को टेस्टचीही तयारी आहे आणि जर आरोप सिद्ध झाले तर मी फासावर जायला तयार आहे”, असं मेहबूब यांनी फेसबुक व्हिडीओ शेअर करत म्हटलं.

भाजपची राज्यभर आंदोलने

मेहबूब यांच्यावर झालेल्या आरोपानंतर विरोधी पक्ष भाजपने आक्रमक रुप धारण केलं. भाजपची विद्यार्थी-युवक संघटना तसंच पक्षातील प्रमुख नेते कार्यकर्ते महाराष्ट्रातील विविध शहरांत मेहबूब यांच्याविरोधात रस्त्यावर उतरले. राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर, औरंगाबाद, जळगाव, नवी मुंबई तसंच इतरही ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. औरंगाबादेतील आंदोलनात तर माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह काही आमदारांनी निदर्शने केली.

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत मेहबूब यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. “जर एखादा सर्वसाधारण आरोपी असता तर तर त्याला लगेच अटक केली असती मग आता राजकीय पदाधिकाऱ्याला आणि विशेष म्हणजे सत्तेतील पक्षातल्या एका पदाधिकाऱ्याला वेगळा न्याय का?”, असा सवाल करत औरंगाबाद पोलिसांनी पीडितेला न्याय मिळवून द्यावा आणि आरोपीला जेरबंद करावं, अशी मागणी केली. तर दुसरा एक व्हिडीओ पोस्ट करत ,”शिवछत्रपतींचा महाराष्ट्र फक्त बोलण्यात नको तर आचरणातही हवा”, असं म्हणत या प्रकरणाचा धागा पकडून महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी सडकून टीका केली.

भाजपच्या आंदोलनानंतर मेहबूब शेख यांची पत्रकार परिषद

मेहबूब यांच्याविरोधात भाजपने राज्यभर आंदोलन केल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये भवनमध्ये दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी आपली बाजू मांडताना मेहबूब शेख यांना भर पत्रकार परिषदेत रडू कोसळलं. आपण निर्दोष असल्याचं सांगतानाच खरं काय आहे हे समजून घेण्यासाठी आपली नार्को टेस्ट करण्याचीही तयारी दर्शवली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे हेही उपस्थित होते.

‘…तर सर्वसामान्य घरातली मुलं राजकारणात येणार नाहीत!”

जर काही केलं नसताना फक्त राजकीय द्वेषातून असे प्रकार व्हायला लागले, तर सर्वसामान्य घरातील मुलं राजकारणात येणार नाहीत. सामान्य घरातील व्यक्तीचे राजकीय आयुष्य अशाप्रकारे उद्ध्वस्त करु नये. दोषी असल्यास मिळेल त्या शिक्षेला सामोरे जाईन प्रसंगी माझी फासावर जायचीही तयारी आहे, असं सांगताना त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.

पोलिसांचं म्हणणं काय…?

मागील 1 वर्षात मेहबूब शेख यांचा तरुणीशी कुठलाही संपर्क झालेला नसल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांनी दिलीय. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मागील 1 वर्षात आरोपी आणि फिर्यादी संपर्कात नसल्याचा खुलासा औरंगाबादचे पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे यांनी केलाय. पोलिसांनी आरोपी आणि फिर्यादी या दोघांचेही सीडीआर काढले. त्याच्या आधारे फिर्यादी आणि आरोपीचा गेले वर्षभर एकदाही संपर्क झाला नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. तरुणीने केलेल्या आरोपांचा तपास करण्यासाठी 3 पथकं करुन औरंगाबाद पोलिस घटनेचा तपास करत आहेत.

वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी रोजी औरंगाबाद पोलिसांनी मेहबूब शेख यांची 6 तास कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान मेहबूब यांना वेगवेगळे प्रश्न विचारले गेले. पाठीमागील काही दिवसांचं त्यांचं वास्तव्य, त्यांचे कॉल डिटेल्स, मागील काही दिवसांच्या गाठीभेटी अशी झाडाझडती पोलिसांनी घेतली. सलग सहा तास कसून चौकशी केल्यानंतर मेहबूब यांना पोलिसांनी सोडून दिलं तसंच गरज पडल्यास पुन्हा चौकशीला बोलावलं जाईल, असंही पोलिसांनी सांगितलं.

मेहबूब यांच्या समर्थनार्थ युवा नेते- ज्येष्ठ नेते मैदानात

मेहबूब यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राष्ट्रवादीत एकच खळबळ माजली होती. गंभीर आरोप झाल्याने लगोलग कुणीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र याला अपवाद ठरले ते मंत्री जितेंद्र आव्हाड. आव्हाड यांनी ट्विट करत मेहबूबवर माझा विश्वास आहे. त्याचा या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही, असं म्हणत आव्हाडांनी शेख यांची पाठराखण केली. आव्हाडांचं हेच ट्विट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रिट्विट केलं. सोबतच आमदार अमोल मिटकरी, आमदार रोहित पवार यांनी मेहबूबकडून अशा प्रकारचं वागणं शक्य नाही. तरीही पोलिस त्यांचं काम करत आहेत. तपासाअंती सत्य बाहेर येईल. विरोधकांनी विनाकारण राजकारण करु नये, अशा प्रतिक्रिया दिल्या.

मेहबूब यांचं यापुढचं पाऊल…??

“मी याअगोदरच सांगितल्याप्रमाणे माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. पोलिसांनी पोलिसांचं काम करावं. पोलिस तपासात माझ्याविरोधात जर पुरावे आढळले तर मला त्यांनी कडक शिक्षा करावी. मी पोलिसांच्या कोणत्याही तपासाला सामोरे जायला तयार आहे. आरोप झाले म्हणून मी घरात बसणारा कार्यकर्ता नाही. पवारसाहेबांच्या आणि राष्ट्रवादीच्या विचारांचा कार्यकर्ता म्हणून मी जनमानसात जाईल. माझी प्रतिमा त्यांना माहिती आहे. माझ्या अगोदरच्या झंझावाताप्रमाणे मी यापुढेही काम करत राहील. झालेल्या आरोपांचा विचार न करता माझं काम मी सुरु ठेवेन”, अशी सविस्तर प्रतिक्रिया मेहबूब यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. (Special Report On NCP Mahebub Shaikh Rape Case)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI