अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांची भेट, म्हणजे कोणत्याही क्षणी ‘गोड’ बातमी : सुधीर मुनगंटीवार

विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येत सत्तास्थापन केली. शिवसेनेने भाजपला डावलून सत्ता स्थापन केल्याने भाजप-शिवसेनेत वाद सुरु आहेत.

  • निलेश डाहाट, टीव्ही 9 मराठी, चंद्रपूर
  • Published On - 18:46 PM, 9 Dec 2019
अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांची भेट, म्हणजे कोणत्याही क्षणी ‘गोड’ बातमी : सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येत सत्तास्थापन केली. शिवसेनेने भाजपला डावलून सत्ता स्थापन केल्याने भाजप-शिवसेनेत वाद सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantivar criticized on shivsena) यांच्या विधानाने महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे.

“लवकरच गोड बातमी कोणत्याही दिवशी, कोणत्याही महिन्यात या महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार आहे. आजची राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट म्हणजे या सरकारला कोणत्याही क्षणी स्थिगिती दिली जाऊ शकते”, असं सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantivar criticized on shivsena) म्हणाले ते टीव्ही 9 मराठीसोबत बोलत होते.

“शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचा जन्म मुळात विचाराच्या आधारावर, कामाच्या आधारावर किंवा विकासाच्या नावावर झाला नाही. तर सत्तेच्या महत्त्वकांक्षेपोटी झालेला आहे. या आघाडीने जनतेच्या जनादेशाचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे”, असा आरोपही यावेळी मुनगंटीवार यांनी केला.

मुनगंटीवार म्हणाले, “जेव्हा अशाप्रकारच्या सरकारचा जन्म होतो तेव्हा ते सरकार विकासकामाच्या ऐवजी तसेच राज्याला प्रगती, उन्नती ऐवजी स्थगिती देण्यावर भर करते. आज महाराष्ट्र फक्त स्थगिती अनुभवत आहे. जर बेरोजगाराच्या धोरणांबद्दल बैठका झाल्या असत्या, शेतकऱ्यांना मदत देण्यासंबंधी चर्चा झाली असती, तर आम्ही विरोध केलाच नसता.”

“आम्हाला सत्तेत यावसं वाटतं ते आपल्या कार्यालयाच्यासमोर मंत्रिपदाची पाटी लागावी यासाठी नाही, तर सामान्य जनतेचे कल्याण व्हावे यासाठी सरकारमध्ये यावे वाटते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकारने चांगली कामं केली, तर नक्कीच आमचे समर्थन असेल”, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सत्तानाट्यानंतर काल पहिल्यांदाच एकाच मंचावर, एकमेकांच्या शेजारी बसल्याचं पाहायला मिळालं. सोलापूर जिल्ह्यातील माढा इथं एका शाही विवाह सोहळ्यात या दोघांनी हजेरी लावली. करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त दोघेही एकत्र आले होते. सत्तानाट्यानंतर दोघेही एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.