देशविरोधी कृत्य आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या रझा अकादमीवर बंदी घाला- अतुल भातखळकर

भेंडी बाजार येथे फ्रान्सच्या प्रधानमंत्र्यांचे फोटो रस्त्यांवर लावून भ्याड निदर्शने करणाऱ्या रजा अकादमीचे हे कृत्य देशद्रोही अशा स्वरूपाचेच आहे. दहशतवादाविरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तीचा अशा प्रकारे निषेध करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

देशविरोधी कृत्य आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या रझा अकादमीवर बंदी घाला- अतुल भातखळकर

मुंबई: फ्रान्सच्या नीस शहरात झालेल्या हल्ल्याचे पडसाद मुंबईत उमटताना पाहायला मिळत आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे पोस्टर्स मुंबईच्या भेंडी बाजार परिसरात पायदळी तुडवण्यात आले. त्यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. फ्रान्सच्या नीस शहरात कुराण हातात घेऊन चर्चमध्ये घुसलेल्या हल्लेखोरांनी तिघांची निर्घृण हत्या केली. काही दिवसांपूर्वी मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र काढल्याने फ्रान्समध्ये एका शालेय शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला होता. त्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी धर्मांध मुस्लिमांबाबत कडक धोरण अवलंबवलं आहे. त्याचाच निषेध रझा अकादमीकडून मुंबईच्या रस्त्यांवर करण्यात आला. (The aftermath of the French attack in Mumbai, BJP demands to action against Raza academy)

रझा अकादमीच्या या निषेधाबाबत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारकडे कारवाईची मागणी केली आहे. ‘मुंबईतील भेंडी बाजार येथे फ्रान्सच्या प्रधानमंत्र्यांचे फोटो रस्त्यांवर लावून भ्याड निदर्शने करणाऱ्या रजा अकादमीचे हे कृत्य देशद्रोही अशा स्वरूपाचेच आहे. दहशतवादाविरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तीचा अशा प्रकारे निषेध करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा आणि त्यांना तात्काळ अटक करा,’ अशी मागणी भातखळकरांनी केली आहे. त्याचबरोबर रझा अकादमीवर बंदी घालण्याची हिम्मत राज्य सरकारने दाखवावी, असं आव्हानच भातखळकर यांनी सरकारला दिलं आहे.

शिवसेनेची भूमिका काय?, भातखळकरांचा सवाल

फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक शब्दात निषेध व्यक्त केला आहे. आज चीनकडून होत असलेल्या कुरघोड्यांना सडेतोड उत्तर देणाऱ्या भारतासोबत फ्रान्स खांद्याला खांदा लावून उभा आहे. अशावेळी फ्रान्सच्या प्रधानमंत्र्यांविरुद्ध महाराष्ट्रात रझा अकादमीचे लोक निदर्शने करत आहेत. याविषयी शिवसेनेची भूमिका काय?, असा सवाल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. त्याचबरोबर चीनमध्ये इतके दिवस मुस्लिम समाजावर अन्याय होत असताना रझा अकादमी गप्प का? असाही प्रश्न भातखळकर यांनी विचारला आहे.

फ्रान्सच्या नीस शहरात दहशतवादी हल्ला

फ्रान्समधील नीस शहरामध्ये नोट्रे डेम चर्चबाहेर झालेल्या हल्ल्यात एका महिलेला जीव गमवावा लागला आहे यासह आणखी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. नीस शहराचे महापौर ख्रिस्तियन इस्त्रोसी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. महापौरांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. नोट्रे डेम चर्च बाहेर हल्ला करणाऱ्या संशयित हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून आणखी काही जण जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संबंधित बातम्या:

फ्रान्समध्ये चर्चबाहेर दहशतवादी हल्ला, तिघांचा मृत्यू

Indian Air Force Day 2020 | भारताच्या ‘हवाई’ शक्तीचं प्रदर्शन, राफेलसह लढाऊ विमानांचा आकाशात थरार!

The aftermath of the French attack in Mumbai, BJP demands to action against Raza academy

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI