UAPA Bill : राज्यसभेत मंजूर झालेल्या UAPA विधेयकाची इतकी धास्ती का?

लोकसभेनंतर आज राज्यसभेतही दहशतवादविरोधी कायदा UAPA संशोधन विधेयक मंजूर झालं. Unlawful activities (prevention) act अर्थात बेकायदा कारवाई विरोधी दुरुस्ती विधेयकामुळे, एखाद्या संघटनेसह स्वतंत्र व्यक्तीलाही दहशतवादी ठरवता येणार आहे.

UAPA Bill : राज्यसभेत मंजूर झालेल्या UAPA विधेयकाची इतकी धास्ती का?

नवी दिल्ली : लोकसभेनंतर आज राज्यसभेतही दहशतवादविरोधी कायदा UAPA Bill संशोधन विधेयक मंजूर झालं. Unlawful activities (prevention) act अर्थात बेकायदा कारवाई विरोधी दुरुस्ती विधेयकामुळे, एखाद्या संघटनेसह स्वतंत्र व्यक्तीलाही दहशतवादी ठरवता येणार आहे. लोकसभेत UAPA Bill  विधेयक गेल्या आठवड्यात मंजूर झालं होतं, आज त्याला राज्यसभेतही हिरवा कंदील मिलाला. या विधेयकामुळे कोणत्याही व्यक्तीला चौकशीच्या आधारे दहशतवादी घोषित करता येऊ शकेल.

या विधेयकावरील चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात निवेदन दिलं. हे विधेयक का गरजेचं आहे हे सांगताना त्यांनी समझोता एक्स्प्रेस स्फोटाचा दाखला दिला.

विरोधकांचा नेमका आक्षेप कोणत्या नियमांना?

दरम्यान, या विधेयकातील पाच आणि सहाव्या नंबरच्या नियमाला विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. केवळ संशयावरुन एखाद्या व्यक्तीला दहशतवादी कसं घोषित करता येईल, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. मात्र सभागृहातील संख्याबळामुळे विरोधकांची मागणी टिकू शकली नाही. 147 विरुद्ध 42 मतांनी UAPA संशोधन विधेयक मंजूर झालं.

कोणाला दहशतवादी ठरवणार?

जर एखादी व्यक्ती दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देत असेल, त्यामध्ये सहभागी असेल, तर त्याला दहशतवादी ठरवलं जाईल.  यापूर्वी केवळ संघटनांवर दहशतवादाचा शिक्का मारला जात होता. आता संशयित व्यक्तीवरही मारला जाईल.

अमित शाहांचं उत्तर

या विधेयकला विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर, गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना उत्तर दिलं. दहशतवाद मूळापासून उपटून टाकायचा असेल, तर कडक पावलं उचलणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले.

“एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करण्याऱ्या कायद्याची गरज आहे. सध्या संयुक्त राष्ट्र, अमेरिका, पाकिस्तान, चीन, इस्रायल आणि युरोपियन युनियनमध्येच असा कायदा आहे. सर्व देशांनी दहशतवादविरोधात हा कायदा केला आहे. त्यामुळे भारतातही तो आवश्यक आहे” असं अमित शाह म्हणाले.

कर नाही तर डर कशाला?

विधेयकाला अनेक विरोधकांनी आक्षेप घेतला. त्यालाही अमित शाहांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, “दहशतवादाचा कोणताही धर्म नसतो. दहशतवादी माणुसकीच्या विरोधात असतात. अनेक गुन्ह्यांमध्ये पुराव्यांची कमतरता असते. त्यामुळे दहशतवाद्यांना फायदा होतो. जर यासीन भटकळला दहशतवादी घोषित केलं असतं, तर तो आधीच पकडला गेला असता. हे मोदी सरकार आहे, काँग्रेसचं नाही. सरकारी यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करतात. एखाद्याला दहशतवादी घोषित केलं म्हणजे सर्व पर्याय बंद झाले असंही नाही. माझं म्हणणं आहे की तुम्ही जर चुकीचं काही केलं नाही तर तुम्हाला भीती नसेल”

दहशतवादी कोणाला घोषित केलं जाऊ शकतं?

  • दहशतवादी कृत्य करणारे
  • दहशतवादी कारवाईची तयारी करणारे
  • दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणारे
  • दहशतवादी कारवाईत सहभाग असणारे

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI