फडणवीसांचे मंत्री की ठाकरे सरकार, कोण मालामाल, कोण गुन्हेगार?

सर्वाधिक संपत्ती ही कडेगाव पलुसचे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांची आहे. त्यांच्याकडे 216 कोटींची मालमत्ता आहे.

  • Updated On - 4:09 pm, Sat, 16 January 21 Edited By: Team Veegam
फडणवीसांचे मंत्री की ठाकरे सरकार, कोण मालामाल, कोण गुन्हेगार?

मुंबई : किती सरकार आली, किती सरकार गेली… मात्र ज्या सरकारची सध्या राज्यावर सत्ता आहे, त्यांच्यावर एका संस्थेची बारीक नजर असते. सरकारमध्ये किती मंत्री कोट्यधीश आहेत, किती गुन्हेगार आहेत, याचा अभ्यास करणाऱ्या ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटीक रिफॉर्म्स’ (ADR) ने फडणवीस सरकार आणि ठाकरे सरकार यांच्यामध्ये काय फरक आहे (Thackeray Fadnavis Govt Difference), यासंबंधी अहवाल प्रसिद्ध केला आहे.

महाराष्ट्रातील एक महिन्याच्या सत्तानाट्यानंतर जनतेला प्रश्न पडला असेल की, फडणवीस सरकार आणि ठाकरे सरकार या दोघांमध्ये फरक आहे तरी काय? आता हाच फरक ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटीक रिफॉर्म्स’ या संस्थेने अधिक स्पष्टपणे दाखवला आहे. फडणवीस सरकारमध्ये 82 टक्के मंत्री कोट्यधीश होते. तर ठाकरे सरकारमध्ये 98 टक्के मंत्री कोट्यधीश आहेत. आकड्यातच सांगायचं, तर ठाकरे सरकारच्या 42 मंत्र्यांपैकी 41 मंत्री कोट्यधीश आहेत..

सर्वाधिक संपत्ती ही कडेगाव पलुसचे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांची आहे. कदमांकडे 216 कोटींची मालमत्ता आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. त्यांची संपत्ती 75 कोटी आहे. तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीच्या राजेश टोपे यांचा नंबर लागतो. राजेश टोपे यांची संपत्ती 53 कोटी इतकी आहे.

हेही वाचा : ठाकरे सरकारमध्ये सांगलीच्या जावईबापूंची चलती, चौघांना मंत्रिपद

विशेष म्हणजे 216 कोटी संपत्ती असलेल्या विश्वजीत कदमांना 121 कोटींचं देणं आहे. तर राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळख असलेले जितेंद्र आव्हाड यांची संपत्ती 47 कोटी इतकी असून त्यांना तब्बल 37 कोटींचं देणं आहे. विरोधी पक्षनेते राहिलेले कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांची संपत्ती ही 44 कोटी इतकी असून त्यांना संपत्तीच्या अर्ध म्हणजेच 22 कोटींचं देणं आहे.

सर्वाधिक उत्पन्नात ठाकरे मंत्रिमंडळात अजित पवारांनी बाजी मारली आहे. 2018-19 चं अजित पवारांचं कौटुंबिक उत्पन्न 3 कोटींहून अधिक आहे. अजित पवारांनंतर नंबर लागतो तो माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांचा. 2018-19 चं अमित देशमुख यांचं उत्पन्न हे 3 कोटींहून अधिक आहे. तिसऱ्या क्रमांकावरील विश्वजीत कदम यांचं 2 कोटी इतकं वार्षिक उत्पन्न आहे.

गुन्हेगारीत बरोबरी

फडणवीस सरकार असो की ठाकरे सरकार. दोघांमध्येही गुन्हेगारीत कुणीच मागे नाही. गुन्ह्यांची नोंद असलेल्या मंत्र्यांची टक्केवारी ही 64 टक्के इतकी आहे. मात्र गंभीर गुन्हेगारीत फडणवीस सरकार पुढे होतं. गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांच्या नोंद असलेल्या मंत्र्यांची टक्केवारी ही फडणवीस सरकारमध्ये 46 टक्के इतकी होती, तर ठाकरे सरकारमध्ये 43 टक्के इतकी आहे. ठाकरे सरकारमध्ये 27 मंत्र्यांवर गुन्ह्यांची नोंद आहे. तर गंभीर स्वरुपांच्या गुन्ह्यांची नोंद 18 मंत्र्यांवर आहे.

एडीआरने या अहवालात 43 पैकी 42 मंत्र्यांच्या मालमत्तांची गुन्हेगारीची माहिती दिली आहे. फक्त एकाच मंत्र्याची माहिती दिली नाही, ते म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. त्यांनी अद्याप निवडणूकच लढवली नसल्याने मालमत्ता अद्याप उघड झालेली नाही. त्यामुळे आता सर्व वाट पाहतील ते एप्रिल महिन्याची जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणूक लढवताना स्वत:ची मालमत्ता जाहीर करतील. मालमत्ता आणि गुन्हेगारीत अव्वल मुख्यमंत्री कोण फडणवीस की ठाकरे, हे तेव्हाच उघड (Thackeray Fadnavis Govt Difference) होईल.